सातारा : नगरपालिका निवडणुकीबाबत कराडकरांमध्ये तर्कविर्तक | पुढारी

सातारा : नगरपालिका निवडणुकीबाबत कराडकरांमध्ये तर्कविर्तक

चंद्रजीत पाटील : कराड : ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कराड नगरपालिका निवडणूक आता लांबणीवर पडली आहे. निवडणूक केव्हा होणार? याबाबत अनिश्चितता असली तरी या निवडणुकीत लोकशाही आघाडीसोबत कोणता गट आघाडी करणार? काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार का? राजेंद्रसिंह यादव आणि भाजपची भूमिका काय असणार? याबाबत आत्तापासूनच तर्कविर्तक लढवले जात आहेत.

काही दिवसांपूर्वी शासनाने प्रभाग रचना रद्द केली आहे. तसेच निवडणूक पुढे ढकलली आहे. त्यामुळेच निवडणुकीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. मात्र, असे असले तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना यासह राजेंद्रसिंह यादव गटाने निवडणुकीची तयारी यापूर्वीच सुरू केली आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक लोकशाही आघाडीच्या झेंड्याखाली पालिका निवडणुकीस सामोरे जातात. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर लोकशाही आघाडीत सामावून घेणे यामुळे लोकशाही सहजशक्य होते.

मागील निवडणुकीत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी जनशक्ती आघाडीचे नेतृत्व केले होेते आणि जनतेने या आघाडीला बहुमतही दिले होते. मात्र, त्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र माने वगळता अन्य जनशक्तीच्या नगरसेवकांनी राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली वेगळा गट निर्माण करत आ. चव्हाण गटापासून फारकत घेतली होती.

जनशक्ती आघाडीतही राजेंद्रसिंह यादव व उपनगराध्यक्ष जयवंत पाटील गटात मतभेद होऊन दोन स्वतंत्र गट कार्यरत झाल्याचे मागील दोन वर्षात पहावयास मिळाले आहे. जयवंत पाटील गट मागील काही महिन्यांपासून काही काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या संपर्कात आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना जयवंत पाटील व लोकशाही आघाडीतही सुसंवाद असल्याचे जिल्हा बँक निवडणूक तसेच अन्य काही कार्यक्रमात हे पाहावयास मिळाले होते. त्यामुळे 2011 मधील निवडणुकीप्रमाणेच हे दोन्ही गट एकत्र असणार का ? याबाबतही नागरिकांमध्ये तर्कविर्तक सुरू आहेत. त्यामुळेच सर्वांच्या नजरा लोकशाही आघाडीच्या भूमिकेकडे लागून राहिल्या आहेत.

स्वबळावर बहुमत मिळणे अवघडच…

कराड शहरातील सध्य राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही एका गटाला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणे सहजशक्य होणार नाही. प्रत्येक गटाची विशिष्ट भागात ताकद आहे, तर काही भागात म्हणावी अशी ताकद नाही. त्यामुळेच संभाव्य आघाडीबाबत तर्कविर्तक सुरू आहेत. मात्र राजकारणात काहीही अशक्य नसते, हेही तितकेच खरं आहे.

Back to top button