किसन वीर कारखाना : मदनदादा मैदानातच; मकरंदआबा लढणार का? | पुढारी

किसन वीर कारखाना : मदनदादा मैदानातच; मकरंदआबा लढणार का?

सातारा ; हरीष पाटणे : गेल्या कित्येक वर्षांपासून असलेला कोट्यवधी रुपयांचा कर्जाचा डोंगर, कामगारांची कोट्यवधी रुपयांची थकीत देणी, 54 हजार सभासदांच्या घामातून शिवारात उभा राहिलेला 14 लाख टनांपैकी शिल्‍लक 5 लाख टन ऊस, बंद अवस्थेत असलेला हा कारखाना तरीही होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींच्या पार्श्‍वभूमीवर अखेर एकेकाळी देशात नावाजल्या गेलेल्या किसन वीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलीच. दि. 3 मे रोजी मतदान होत असलेल्या किसन वीरच्या मैदानात कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले ‘किसन वीर’च्या लढाईच्या मैदानात आधीपासून आहेतच आता सभासदांच्या हितार्थ वाई, खंडाळा, महाबळेश्‍वर विधानसभा मतदारसंघाचे आ. मकरंदआबा पाटील मैदानात येणार का? याविषयी संपूर्ण राज्यात उत्सुकता आहे.

‘किसन वीर’चे रणांगण गाजणार की पाच वर्षांपूर्वी जशी रणांगणातून माघार घेतली तशीच माघार घेवून कुस्तीविनाच फड निकाली होणार याबाबत राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

वाई, खंडाळा, सातारा, जावली व कोरेगाव या पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या 54 हजार सभासदांची मालकी असलेल्या किसन वीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक दि. 3 मे रोजी होत आहे. 5 वर्षांपूर्वी निवडणूक लागली; मात्र आ. मकरंद पाटील व नितीनकाका पाटील यांनी किसन वीर कारखान्याच्या लढाईतून माघार घेतली.

आ. मकरंद पाटील व नितीनकाका पाटील यांच्या या निर्णयावर त्यावेळेस बर्‍याच प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. मात्र, मदन भोसले यांनी चुकीचा कारभार करून कर्जाचा डोंगर कारखान्यावर उभा केल्याचे सांगत एवढ्या कर्जबाजारी कारखान्यासाठी निवडणूक लढवून काय उपयोग? असे कारण सांगत मेळावा घेवून निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यावेळी झाला होता.

5 वर्षात परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याऐवजी परिस्थिती आणखीणच बिकट झाली आहे. कारखान्यावरील कर्ज 800 कोटींच्या घरात जावून पोहचले आहे. सुमारे 55 कोटी रूपयांची कामगारांची थकीत देणी आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा किसनवीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. मधल्या काळात किसनवीरचे युनिट असलेल्या खंडाळा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली.

आ. मकरंद पाटील यांनी कारखान्यावर परिवर्तन घडवून तो ताब्यातही घेतला. मात्र, खंडाळा कारखानाही अद्याप सुरू झालेला नाही. उलट खंडाळ्याच्या मालकीचा म्हणवला जाणारा हा कारखाना आणखीही काही तालुक्यांच्या मालकीचा होईल असाच निर्णय पहिल्याच संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यावरून खंडाळ्यातही क्रिया-प्रतिक्रिया उमटत आहेत.

खंडाळा कारखान्याच्या निवडणुकीदरम्यानच भुईंजच्या किसनवीर कारखान्याच्या कारभारासंदर्भात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. पत्रकार परिषदा घेवून मदनदादा भोसले व नितीनकाका पाटील यांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडले. जुन्या-पान्या गोष्टी उगळल्या गेल्या. कारखाना कधी सुरू होणार? शेतकर्‍याचा 14 लाख टन ऊस कसा गाळला जाणार? कामगारांची थकीत देणी कशी दिली जाणार? आणि किसनवीर कारखाना कर्जमुक्‍त कसा होणार? याबाबत मात्र दोन्ही बाजूंनी ठोस निर्णय झालेले नाहीत. पर्यायाने देशभक्‍त किसनवीर आबा यांचे नाव असलेल्या कारखान्याची राज्याच्या विधीमंडळातही बदनामीच झाली.

शिवारात उभ्या असलेल्या शिल्‍लक उसाबाबत दै. ‘पुढारी’च्या रेट्यानंतर सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी साखर आयुक्‍तांना मास्टर प्लॅन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार हंगाम लांबवून सातारा जिल्ह्यातील 7 व बाहेरच्या जिल्ह्यातील 2 अशा 9 कारखान्यांमार्फत ऊस तोडण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. याचदरम्यान थकीत देण्यांच्या मागणीसाठी कामगार वर्गही आंदोलनाला बसला. मात्र, दोनच दिवसात हे आंदोलनही मागे घेण्यात आले. या सर्व पार्श्‍वभूमीवर दि. 3 मे रोजी किसनवीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. किसनवीर कारखान्याचे चेअरमन म्हणून मदनदादा भोसले यांना जबाबदारी झटकता येणारच नाही.

किसनवीर कारखान्याच्या निवडणुकीत ते असणारच आहेत, त्यांना पळून जाताच येणार नाही किंवा मी निवडणूक लढवणार नाही, असेही म्हणता येणार नाही. त्यामुळे ते मैदानात आहेतच; उत्सुकता आहे ती आ. मकरंद पाटील मैदानात येणार का? निवडणूक लढवणार का? पाच वर्षापूर्वी निवडणूक न लढवल्याने कार्यकर्त्यांमध्ये जो संदेश गेला तोच संदेश याही निवडणुकीत निवडणूक नाही लढवली तर जाऊ शकतो. याचा आ. मकरंद पाटील विचार करतील का? खंडाळ्याची निवडणूक लढवता मग भुईंजची निवडणूक का लढवत नाही? या प्रश्‍नाला आ. मकरंद पाटील समर्पक उत्तर काय देणार? याविषयी उत्सुकता आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी न गाजलेले किसनवीरचे रणांगण यावर्षी तरी गाजणार का? की कुस्तीचा फड निकाली निघणार याविषयी संपूर्ण राज्यात उत्सुकता आहे.

Back to top button