सातारा : भोंदू बुवा -बाबांवर कारवाई होणार का? | पुढारी

सातारा : भोंदू बुवा -बाबांवर कारवाई होणार का?

कराड : पुढारी वृत्तसेवा; ग्रामीण भागात अंधश्रद्धा कायम आहेत. अनेक गावांमध्ये बुवाबाजीचे प्रकार चालत आहेत. त्याला बळी पडलेले अनेक कुटुंब आयुष्यातून उद्ध्वस्त झाली आहेत. गरीबी दूर करतो, रोग दूर करतो, कल्याण करतो अशा बुवा- बाबांचे प्रस्थ वाढताना दिसत आहे. अंधश्रध्देचा कायदा झाला तरी अशा भोंदू बुवा-बाबांवर कारवाई होताना दिसत नाही.

निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी लिंबू, गुलाल, नारळ टाकण्याचे प्रकार यापूर्वी कराड तालुक्यात पाहायला मिळाले होते. मांजर आडवे गेले तरी काहीजण पुढे जाणे किंवा शुभकार्य करणे टाळतात. घुबड, कासव, मांडूळ अशा वन्यप्राण्यांचे जीव अंधश्रद्धेत घेतले जात आहेत. अनेक ठिकाणी देवाला कोंबडी, बकरी दिली जात आहेत.

यावरून अंधश्रद्धेने प्राणीमात्रांनाही सोडलेले नाही. जटा वाढवणे, उतारा करणे, लिंबू, बिबे टाकणे, सुई टोचणे, करणी करणे, मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार सोडवणूक करणे आदी प्रकार घडताना पहावयास मिळत आहेत. याला महिला वर्गासह सुशिक्षित वर्गही बळी पडत आहे.
अंधश्रद्धेमुळे कोणाचे चांगले तर होतच नाही, पण पैसे आणि वेळ फुकट जातो, याची जाणीव मात्र लोकांना नसते.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील फरक ओळखला जात नाही. शिक्षित समाजही अंधश्रद्धेच्या विकृतींना व अघोरी कृत्यांना प्रखर विरोध करताना दिसत नाही. त्यामुळे नरबळी सारख्या घटनांनी समाज व्यवस्था हादरून जात आहे. त्याला वेळीच पायबंद घालण्याची गरज आहे.

भोंदू बुवा-बाबा आजही समाजात राजरोस वावरत आहेत. अंधश्रद्धेच्या थोतांडाचे उदात्तीकरण ही मंडळी करत आहे. गोरगरीब, परिस्थितीने गंजलेला समाज याला बळी पडत आहे. अंधश्रद्धेचा कायदा झाला पण त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने आणि शासन याबाबत उदासीन असल्याने बुवाबाजीचे प्रस्थ वाढताना दिसत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button