पंजाबमध्ये 68.30 टक्के तर उत्तरप्रदेशात 60.21 टक्के मतदान | पुढारी

पंजाबमध्ये 68.30 टक्के तर उत्तरप्रदेशात 60.21 टक्के मतदान

चंदीगड  : पंकजकुमार मिश्रा

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत रविवारी पंजाबच्या सर्व 117 जागांसह उत्तर प्रदेशच्या तिसर्‍या टप्प्यातील 59 जागांसाठी मतदान पार पडले.

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी सर्व 117 जागांवर सायंकाळी सहापर्यंत एकूण 68.30 टक्के मतदानाची नोंद झाली. 1304 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये 77.4 टक्के मतदान झाले होते. पंजाबमध्ये सकाळी 11 पर्यंत 18 टक्के, दुपारी 1 पर्यंत 34 टक्के, दुपारी तीनपर्यंत 50 टक्के मतदान झाले. सिद्धू आणि मजिठिया असा सामना असलेल्या अमृतसर पूर्व मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत मतदान 53 टक्क्यांवर पोहोचले.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा मतदारसंघ असलेल्या पतियाळा येथे सायंकाळी पाचपर्यंत 59 टक्के, मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांच्या चमकौर साहिब मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत 68 टक्के तर भदौड मतदारसंघात 71.30 टक्के मतदान झाले. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंह बादल यांच्या जलालाबाद येथे 71.50 टक्के मतदान झाले. आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्या धुरी मतदारसंघात पाचपर्यंत 68 टक्के मतदान झाले.  मुख्यमंत्री चन्नी चमकौर साहिब आणि भदौर येथून निवडणूक लढवत आहेत, पण त्यांचे मतदान खरड मतदारसंघात आहे. आपचे भगवंत मान धुरी येथून लढत असले तरी त्यांचे मतदान मोहालीत आहे.

डेरा सच्चा सौदाचा कोडवर्ड

गुरमित सिंह राम रहिम यांच्या डेरा सच्चा सौदाने भाजप व अकाली दलाला पाठिंबा दिला व तसा संदेशही समर्थकांपर्यंत ‘फूल के साथ तगडी’ असा कोडवर्ड पोहोचवला. फूल म्हणजे कमळ जे भाजपचे चिन्ह आहे आणि तगडी म्हणजे तराजू जे शिरोमणी अकाली दलाचे चिन्ह आहे. तथापि, भाजप पंजाब लोक काँग्रेससोबत तर शिरोमणी अकाली दल बसपासोबत निवडणूक लढवत आहे.

उत्तरप्रदेशात 60.21 टक्के

लखनौ : हरिओम द्विवेदी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत तिसर्‍या टप्प्यात रविवारी 16 जिल्ह्यातील 59 मतदारसंघात सायंकाळी सहापर्यंत 60.21 टक्के मतदान झाले. किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत झाले. भाजप आणि सपाकडून परस्परांवर बूथ कॅप्चरिंगचे आरोप झाले आहेत.
करहल येथून सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याविरोधात लढत असलेल्या केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांनी सपाच्या गुंडांनी 12 हून अधिक बूथवर कब्जा केल्याचा आरोप केला. सपाच्या गुंडांनी मारहाण करून या बूथमध्ये नागरिकांना सपाला मतदान केल्याचा आरोप त्यांनी केला. तर बिठूर येथे भाजपने बोगस मतदान केल्याची तक्रार सपाने केली.

अनेक बूथवर मतदारांचे नावच मतदार यादीतून वगळल्याचे समोर आले आहे. कानपूरच्या कँट मतदारसंघात सुशीलकुमार श्रीवास्तवर यांचे नाव यादीत नव्हते. त्यांचे नाव मृतांच्या यादीत होते. त्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. याच मतदारसंघात ब्रिजेशकुमार शुक्ला यांच्या कुटुंबातील 8 जणांची नावे यादीतून वगळली होती. कासगंज येथे बोगस मतदानप्रकरणी नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपांचा रवि‘वार’

उत्तर प्रदेशच्या राजकारणात रविवार महत्त्वाचा ठरला. एकीकडे 16 जिल्ह्यातील 59 मतदारसंघात मतदान सुरू असताना दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे वार होत राहिले. पंतप्रधान मोदी यांनी उन्नाव आणि हरदोईत सभा घेतली तर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बलरामपूर, मुख्यमंत्री योगींनी लखिमपूर खिरी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पूर्वांचल येथे सभा घेतली. तर अखिलेश यादव यांनी मतदान आटोपून अयोध्या आणि बाराबंकी येथे सभा घेतल्या. प्रियांका गांधींनी रायबरेलीत कोपरा सभा घेतली.

Back to top button