नाशिक : महापालिकेसाठी राष्ट्रवादीकडून चाचपणी, सिडकोमधील इच्छुकांची बैठक | पुढारी

नाशिक : महापालिकेसाठी राष्ट्रवादीकडून चाचपणी, सिडकोमधील इच्छुकांची बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी नाशिक महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे. पक्षातर्फे पहिल्या टप्प्यात सिडको विभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

जुने सिडकोमधील कुबेर लॉन्स येथे झालेल्या या मुलाखतीच्या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, बाळासाहेब गिते, मकरंद सोमवंशी, दत्ता पाटील, संजय खैरनार आदींनी उमेदवारांची चाचपणी केली.

नानासाहेब महाले यांनी मार्गदर्शन करताना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्याकरिता सर्वाधिक निधी आणल्याचा इतिहास कोणी पुसू शकत नाही. त्यामुळे भुजबळ यांनी केलेली विकासकामे जनतेसमोर मांडून महापालिकेत सत्तेवर आणण्याची हीच खरी वेळ असल्याचे सांगितले. डॉ. हिरे यांनी त्यांच्या मनोगतात महापालिकेतील सत्ताधारी दत्तक नाशिकच्या विधानावरून सत्तेवर आले. पण, त्यांनी नाशिकप्रती तिळमात्र प्रेम दाखविले नाही. केंद्राकडून मेट्रोची घोषणा झाली.

राज्याच्या त्यांच्या वाट्याचा निधीदेखील दिला. परंतु, केंद्राने अद्यापही निधीची घोषणा केली नसल्याचे ते म्हणाले. नाशिकमध्ये नवीन उद्योग आणण्यासाठी तसेच शहराच्या सर्वागीण विकासाकरिता महापालिकेवर सत्ता येणे गरजेचे असून, त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. निवडणूक आयोगाकडून प्रभागांचे आरक्षण व महिला आरक्षण घोषित झाले नसले, तरी संभाव्य बाबी विचारात घेत चाचपणी करण्यात आली. या वेळी 300 इच्छुक चाचपणीसाठी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button