satara crime : गर्भवती महिला मारहाण प्रकरण, मारकुट्या माजी सरपंचाला पोलिस कोठडी | पुढारी

satara crime : गर्भवती महिला मारहाण प्रकरण, मारकुट्या माजी सरपंचाला पोलिस कोठडी

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : पळसावडे (जि. सातारा) येथे गर्भवती वनरक्षक महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण करणार्‍या माजी सरपंचासह त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) केली आहे. आज (दि.२०) त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, जखमी महिला वनरक्षकाची तब्येत सध्या ठीक असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. (satara crime)

रामचंद्र गंगाराम जानकर व प्रतिभा जानकर (दोघे रा.पळसावडे) असे अटक केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. जखमी गर्भवती महिला वनरक्षक सिंधू बाजीराव सानप (वय २४, रा. दिव्यनगरी, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.

satara crime : २२ पर्यंत पोलिस कोठडी

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार सिंधू सानप व त्यांचे पती हे दोघे वनरक्षक आहेत. (दि. १७) रोजी पासून संशयित आरोपींनी सलग दोन दिवस गर्भवती असलेल्या वनरक्षक महिलेला ‘मजूर का घेवून गेला?’ या रागातून त्रास दिला. (दि. १९) रोजी सकाळी ८ वाजता तक्रारदार व त्यांचे वनरक्षक पती सुर्याजी ठोंबरे हे काम करत असताना तेथे संशयित आरोपी पती व पत्नी आले व त्यांनी पुन्हा वाद घालत थेट तक्रारदार व त्यांच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

तक्रारदार या गर्भवती असतानाही त्यांना मारहाण करण्यास सुरुवात झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेचे व्हिडीओ शुटींग करण्यात आल्याने त्यातील दाहकता स्पष्ट समोर आली.

या सर्व घटनेनंतर तक्रारदार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले व पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीं विरुध्द गुन्हा दाखल केला. संशयित दोघेही शिरवळ येथील एका नातेवाईकाकडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने त्यांना तेथून ताब्यात घेतले. रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आली. अटकेबाबतची माहिती पत्रकार परिषदेत अप्पर पोलिस अधिक्षक अजित बोर्‍हाडे यांनी माहिती दिली.

पोनि विश्वजीत घोडके यांनी दुपारी संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. दरम्यान, पोलिस संशयितांकडे चौकशी करत असून त्यानुसार जाबजबाब घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, सहाय्यक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, पोनि किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, फौजदार गणेश वाघ, पोलिस हवालदार विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, रोहित निकम यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Back to top button