कृष्णा नदीत पिता-पुत्र बुडाले; कोडोलीत वाकळा धुताना दुर्घटना : एकाचा मृतदेह सापडला | पुढारी

कृष्णा नदीत पिता-पुत्र बुडाले; कोडोलीत वाकळा धुताना दुर्घटना : एकाचा मृतदेह सापडला

कोडोली : पुढारी वृत्तसेवा

पाटण तालुक्यातील रोमणवाडी-येराड येथील शेततळ्यात बुडून बहिण- भावाचा मृत्यू झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी कृष्णाधाम कोडोली येथे पिता -पुत्र कृष्णा नदीत बुडाल्याची हृदयद्रावक घटना घडली. महाबळेश्‍वर तसेच शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले. शोध मोहिमेदरम्यान वडिलांचा मृतदेह सापडला असून मुलाचा शोध रात्री उशीरापर्यंत सुरुच होता.

याबाबत अधिक माहिती अशी, कोडोली- चंदननगर (ता. सातारा) येथील अंकुश लक्ष्मण साळुंखे (वय 35) मुलगा प्रीतमसह (वय 12) वाकळा धुण्यासाठी कृष्णाधाम येथे गेले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा धाकटा मुलगा व चुलत भावही गेले होते. कोडोली-दत्तनगर नजीकच कृष्णा धाम आहे. दुचाकीवरुन वाकळा घेवून ते गेले होते. अंकुश व प्रीतम हे बाप-लेक कृष्णा नदीच्या घाटालगतच्या पाण्यात उतरुन वाकळा धूत होते. अंकुशचा चुलतभाऊ व त्यांचा धाकटा मुलगा हे घाटाच्या पायर्‍यावरबसले होते. वाकळा धूत असतानाच प्रीतमला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून जावू लागला. मुलगा प्रीतम पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असल्याचे वडिलांच्या लक्षात येताच त्याला वाचवण्यासाठी वडील त्याच्या दिशेने गेले. परंतु, खोल पाण्याचा अंदाज त्यांनाही न आल्याने व दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी अंकुश यांच्या घाटावर बसलेल्या चुलत भावाने, लहान मुलाने आरडाओरडा केला. परंतु, परिसरात कोणीच नसल्याने त्यांचे प्रयत्न वाया गेले.

संबंधित बातम्या

अंकुश यांच्या चुलत भावाने या घटनेची माहिती मोबाईलवरुन घरी सांगितली. यानंतर वसाहतीमधील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात ही खबर देण्यात आली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे व महाबळेश्वर रेस्क्यू टिमलाही पाचारण करण्यात आले. याचवेळी बघ्यांचीही गर्दी तेथे जमली. यावेळी गळाच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, त्यात यश आले नाही. त्यामुळे बोटीद्वारे शोधकार्य सुरु करण्यात आले. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास खोल पाण्यातून अंकुश यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सायंकाळी उशीरापर्यंत प्रीतमला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्याचा शोध लागला नाही. रात्री उशीरापर्यंत शोधकार्य सुरुच होते.

हे पिता -पुत्रही पाटण तालुक्यातीलच
या दुर्घटनेची माहिती अंकुशच्या घरी समजताच कुटुंबात हलकल्लोळ माजला. पत्नी व मुलांनी हंबरडा फोडला. साळुंखे कुटुंब मुळचे पाटण तालुक्यातील टोळेवाडी येथील असून कामानिमित्त ते कोडोली-चंदननगर येथे रहात आहे.या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस स्टेशनला झाली असून पी आय जाधव तपास करत आहेत.

पाहा व्हिडिओ : १३ वर्षांचा सुशील जपतोय महाराष्ट्राची लोककला | Story of Lavani and 13 years old boy

Back to top button