अवकाळी पाऊस : अवकाळीने बळीराजा बेजार! | पुढारी

अवकाळी पाऊस : अवकाळीने बळीराजा बेजार!

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ( अवकाळी पाऊस ) कृषी क्षेत्राला जवळपास साडेतीन हजार कोटींचा दणका बसला आहे. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. साखर हंगामही लांबणीवर पडून ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान होणार आहे. पश्चिम भागातील खरिपालाही फटका बसला आहे. शेती आणि शेतकर्‍यांबरोबरच मजुरांच्या आयुष्यालाच या अवकाळीने अवकळा आणली आहे.

2 डिसेंबर रोजी जिल्ह्याच्या बहुतांश भागात तुफानी अवकाळी पावसाने ( अवकाळी पाऊस ) हजेरी लावली. जवळपास चौदा ते पंधरा तास सलगपणे हा पाऊस कोसळत होता. जिल्ह्यात ऊस आणि द्राक्षे या पिकांखालील क्षेत्र सर्वाधिक असल्यामुळे या दोन पिकांवर अवकाळीचा भयंकर परिणाम झाला आहे.

जिल्ह्यात 79 हजार 440 हेक्टर इतके द्राक्षाचे क्षेत्र आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे यंदाचा द्राक्ष हंगाम महिना-दीड महिना उशिरानेच सुरू झाला आहे. हंगामाच्या पहिल्या टप्प्यातच ऑक्टोबरमध्ये अवकाळीने दणका दिल्याने जवळपास 25 टक्के बागा वाया गेल्या होत्या. उरल्यासुरल्या बागांपैकी आणखी 30-35 टक्के बागा परवाच्या अवकाळी दणक्यात धारातिर्थी पडल्या आहेत.

जिल्ह्यात द्राक्ष हंगामाचे अर्थकारण जवळपास पाच हजार कोटी रुपयांचे आहे. त्यापैकी जवळपास तीन हजार कोटी रुपयांवर दोन-तीनवेळच्या अवकाळीने पाणी फिरविले आहे. उरल्यासुरल्याचाही काही भरोसा राहिलेला नाही.

जिल्ह्यात यंदा 1 लाख 22 हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. जवळपास एक कोटी टन इतका विक्रमी ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. या सगळ्या उसाचे गाळप करणे हे यंदा साखर कारखान्यांपुढे आव्हान आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमधील अवकाळीमुळे आधीच हंगाम लांबलेला आहे. तशातच परवा झालेल्या मुसळधार अवकाळीमुळे जिल्ह्यातील बहुतांश भागातील ऊसतोडी ठप्प झाल्या आहेत. उसाच्या फडांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे आणखी आठवडाभर तरी हंगाम नव्या जोमाने सुरू होऊ शकत नाही. परिणामी, साखर हंगाम लांबून त्याचा शेतकर्‍यांना किमान 500 कोटी रुपयांचा दणका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

खरिपाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप ज्वारी भुईसपाट झाली आहे. पाण्यात बुडून गेल्याने हरभर्‍याचे पीक वाया गेल्यात जमा आहे. घाटमाथ्यावरील खरीप गव्हाचे आणि शिराळ्यातील खरीप भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील द्राक्षशेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास येत्या दोन-तीन वर्षांत 50 टक्के द्राक्ष बागा शेतकरी काढून टाकतील. अस्मानी संकटातून शेतकरी आणि द्राक्षशेती वाचवायची असेल, तर शासनाने अवकाळी पावसाने द्राक्ष बागांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत. तत्काळ नुकसानभरपाई द्यावी; अन्यथा भविष्यात द्राक्षशेती मातीमोल व्हायला वेळ लागणार नाही.
– जगन्नाथ मस्के,
माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 30 ते 40 टक्के द्राक्ष बागांना फटका बसल्याचा अंदाज आहे. सप्टेंबरमध्ये छाटणी झालेल्या बागांमध्ये मन्यामध्ये पाणी उतरण्याच्या अवस्थेत क्रॅकिंग दिसून येत आहे. ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा आंबिया बहार उतरविला आहे. त्या शेतकर्‍यांना नुकसानीचे ट्रिगर लागू झाले आहे. त्यामुळे या शेतकर्‍यांना साधारणत: 40 हजार ते दोन लाख 34 हजार एवढी नुकसानभरपाई मिळू शकते.
– मनोज वेताळ, जिल्हा कृषी अधिकारी

Back to top button