सांगली : महाडिक गटाचा राष्ट्रवादीला धक्का

“इस्लामपूर : मारूती पाटील” image=”http://”][/author]

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत अतिशय चुरस असलेल्या बँक-पतसंस्था गटातून भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक यांनी महाविकास आघाडीचे किरण लाड यांचा पराभव करीत वादळात दिवा लावला आहे. महाडिक यांचा हा विजय वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का देणारा तर महाडिक गट व भाजपची ताकद वाढविणारा ठरणार आहे.

निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच महाडिक यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मैदानातून माघार घ्यायची नाही, याच निर्धाराने ते पूर्ण तयारीनिशी निवडणुकीत उतरले होते. संपूर्ण जिल्हा पिंजून काढत त्यांनी मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवला होता.
सुरुवातीपासून मतदारांशी असलेला संपर्क, कार्यकर्त्यांचे परिश्रम, प्रचाराचे परफेक्ट नियोजन तसेच (स्व.) नानासाहेब महाडिक यांचे जिल्ह्यातील नेत्यांशी असलेले ऋणानुबंध यामुळे महाडिक यांचा विजय सुकर झाला. राहुल यांच्या विजयात त्यांचे बंधू सम्राट महाडिक व कार्यकर्त्यांचे मोठे योगदान राहिले आहे

सुरुवातीला महाविकास आघाडीला एकतर्फी वाटणारी निवडणूक भाजपमधील काही दिग्गज उमदेवारांमुळे चुरशीची बनली. वाळवा तालुक्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, वैभव शिंदे यांचा या निवडणुकीत विजय निश्चित मानला जात होता. मात्र भाजपच्या राहुल महाडिक व सी. बी. पाटील यांच्या उमेदवारीमुळे रंगत वाढली होती.

पाटील यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला तरी महाडिक यांनी किरण लाड यांचा पराभव करीत राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. राहुल यांच्या निवडीने महाडिक घराण्यातील पहिली व्यक्ती जिल्हा बँकेत गेली आहे. या विजयाने पुन्हा एकदा महाडिक गटाचे प्रभुत्व अधोरेखित झाले आहे. हा विजय महाडिक गटाला ऊर्जा देणारा तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तालुक्यात भाजपची ताकद वाढणारा ठरणार आहे.\

वादळात लावला दिवा.

या निवडणुकीत महाडिक गटाला डावलून निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र राहुल महाडिक यांनी निवडणूक मैदानातून माघार न घेण्याचा पक्का निर्धार केला होता. त्यांनी वैयक्तिकरित्या संपूर्ण जिल्हा पिंजून काढत मतदारांशी संपर्क साधल्याने त्यांना या निवडणुकीत यश मिळाले. त्यांचा विजय हा वादळात दिवा लावल्यासारखाच आहे.

Exit mobile version