Sangli Gram Panchayat Elections Result : गावठाण भेंडवडे, राजधानी भेंडवडे ग्रामपंचायतींत सत्तांतर; देवनगरचा सरपंच बिनविरोध | पुढारी

Sangli Gram Panchayat Elections Result : गावठाण भेंडवडे, राजधानी भेंडवडे ग्रामपंचायतींत सत्तांतर; देवनगरचा सरपंच बिनविरोध

विटा: पुढारी वृत्तसेवा: खानापूर तालुक्यात गावठाण भेंडवडे आणि राजधानी भेंडवडे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सत्तांतर झाले. देवनगर येथे बिनविरोध पॅनेलचा उमेदवार सरपंचपदी निवडून आला. तर अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या लढतीत साळशिंगे येथे सत्ताधारी गटाने पुन्हा बाजी मारली. राजधानी भेंडवडे आणि साळशिंगे या दोन ग्रामपंचायती माजी आमदार पाटील गटाकडे तर गावठाण भेंडवडे येथे विद्यमान आमदार अनिल बाबर गटाकडे सत्ता आली. आज (दि.६) विटा येथील महसूल भवनाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरूवात झाली. (Sangli Gram Panchayat Elections Result)

खानापूर तालुक्यातील चार ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत ८५.३० % मतदान झाले. यावेळी एकूण ४ हजार ४८२ पैकी ३ हजार ८२३ मतदान झाले. यात १ हजार ८५९ महिला आणि १ हजार ९६४ पुरूष मतदारांचा समावेश आहे. (Sangli Gram Panchayat Elections Result)

मतमोजणीच्या प्रारंभी देवनगर येथील एकमेव सरपंचपदाच्या जागेसाठी मतमोजणी झाली. यात विशाल सुभाष पवार विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी सतीश रमेश पाटोळे यांच्यावर तब्बल १५० मतांनी मात केली . विशाल पवार यांना २८० तर विरोधी सतीश पाटोळे यांना १३० मते पडली. या ठिकाणी नोटाला ४ मध्ये पडली.

Sangli Gram Panchayat Elections Result : साळशिंगेत माजी आमदार पाटील गटाचेच पुन्हा वर्चस्व : सरपंचपदी छाया पवार

खानापूर तालुक्यातील साळशिंगे सरपंचपदी छाया भीमराव पवार विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी गौरी विश्वासराव जाधव यांच्यावर केवळ ५ मतांनी मात केली. छाया पवार यांना ८४७ तर विरोधी गौरी जाधव यांना ८४२ मते पडली. या ठिकाणी नोटाला २ मध्ये पडली.
साळशिंगे तिसऱ्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती महिला या जागेसाठी झालेल्या अंजना बंडू कांबळे आणि ज्योती संतोष यादव यांच्या लढतीत दोघींनाही प्रत्येकी २९१ अशी समसमान मते पडली. या ठिकाणी नोटाला ११ मते पडली आहेत. त्यामुळे या जागेसाठीचा निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर पुनर्मतमोजणी करण्यात आली. मात्र, मतांच्या आकडेवारीत फरक होत नसल्याचे पाहून तहसीलदार उदय सिंह गायकवाड यांनी ईश्वर चिट्ठी काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार समयरा मुजफ्फर जमादार या सहा वर्षाच्या मुलीने ज्योती यादव हिची चिठ्ठी उचलली. त्यामुळे ज्योती यादव यांना विजयी घोषित करण्यात आले.

भेंडवडे राजधानीच्या सरपंचपदी स्नेहल पाटील

तालुक्यातील भेंडवडे राजधानी येथे सरपंच पदाच्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत स्नेहल विशाल पाटील या विजयी झाल्या आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी सिंधू हणमंत जानकर यांच्यावर ३६ मतांनी मात केली. स्नेहल पाटील यांना १७१ तर विरोधी सिंधू जानकर यांना १३५ मते पडली. येथे सरपंच पदाच्या सर्वसाधारण महिला या जागेसाठी लढत होती.

भेंडवडे गावठाणच्या सरपंचपदी वैभव जानकर

खानापूर तालुक्यातील भेंडवडे गावठाण येथे सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत वैभव जानकर यांनी विजयी मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी यशवंत जाधव यांच्यावर ३०७ मतांनी मात केली. वैभव जानकर यांना ६७५ तर विरोधी अपक्ष यशवंत जाधव यांना ३६८ मते पडली. या ठिकाणी तिरंगी लढत होती. येथे वैभव जानकर, सुजित जानकर आणि यशवंत जाधव अशी लढत होती.येथे सरपंचपदाच्या सर्वसाधारण महिला या जागेसाठी लढत होती. या ठिकाणी सत्तांतर झाले आहे. पूर्वी या ठिकाणी राष्ट्रवादी जयंत पाटील गटाचे राजू जानकर यांच्या गटाची सत्ता होती. आता विद्यमान आमदार बाबर गटाची सत्ता आली आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किसन जानकर यांचे पुतणे वैभव जानकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे.

दरम्यान, साळशिंगे आणि राजधानी भेंडवडे या दोन गावांमध्ये आमच्या गटाची सत्ता आल्याचा दावा पाटील गटाचे नेते आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केला आहे.

साळशिंगे येथे गौरी जाधव या सरपंचपदाच्या उमेदवार होत्या. त्या विद्यमान आमदार अनिल बाबर गटाच्या नेत्या आणि खानापूर पंचायत समितीच्या माजी सभापती मनीषाताई बागल यांच्या सख्ख्या बहिण होत. साळशिंगे ग्रामपंचायत गेल्यावेळी माजी आमदार सदाशिवराव पाटील गटाकडे होती. यावेळी बाबर गटाने ती आपल्याकडे खेचून घेण्याचा चंग बांधला होता. परंतु त्यांना अपयश आले आहे. अत्यंत झालेल्या चुरशीच्या आणि अटी तटीच्या निवडणुकीत माजी आमदार पाटील गटानेच पुन्हा एकदा बाजी मारली आहे.

खानापूर तालुक्यातील राजधानी भेंडवडे व साळशिंगे ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकल्याचा दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

हेही वाचा 

Back to top button