

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 83 ग्रामपंचायतींसाठी रविवारी किरकोळ प्रकार वगळता चुरशीने 82.15 टक्के मतदान झाले. काही ठिकाणी पाचनंतर मतदार आल्याने मतदान सायंकाळी साडेसहापर्यंत सुरू होते. अकरा संवेदनशील गावांमध्ये चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमवारी तालुक्याच्या मुख्यालयाच्या बारा ठिकाणी मतमोजणी होणार असून, दुपारपर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहे.
रविवारी सकाळी 7.30 वा. मतदानाला उत्साहात आणि चुरशीने प्रारंभ झाला. जिल्ह्यात सकाळी साडेनऊपर्यंत 14 टक्के, साडे अकरापर्यंत 34, तर दुपारी दीड वाजेपर्यंत 54 टक्के मतदान झाले. दुपारी साडेतीनपर्यंत 72 टक्के मतदान नोंदवले गेले. 83 ग्रामपंचायतीसाठी सुमारे 82.15 टक्के मतदान झाले. सकाळी अकरानंतर मतदानाला गती आली. बाहेरगावी असलेल्या मतदारांना आणण्यावर सर्वच उमेदवारांचा भर होता. कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथे काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने सायंकाळी 6.30 पर्यंत याठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू होती. काही ठिकाणचे किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत झाले. संवेदनशील गावांमध्ये चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पोटनिवडणुकीसह 83 ठिकाणी ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. एकूण 847 सदस्यांच्या जागेसाठी 1 हजार 530 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, सरपंचपदाच्या 81 जागेसाठी निवडणुकीत 222 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ होत असून, दुपारपर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर गावामध्ये चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यात 83 ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाले. संवेदनशील निवडणूक असताना जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांनी मोबाईल उचलला नाही. यामुळे तक्रारी झाल्या का, मतदान प्रक्रिया का लांबली, मतमोजणीनंतर मिरवणुकीला परवानगी आहे का, याची माहिती मिळू शकली नाही.