Dengue : ‘एडिस’चे डंख वाढले; डेंग्यूचे रुग्ण दुप्पट | पुढारी

Dengue : ‘एडिस’चे डंख वाढले; डेंग्यूचे रुग्ण दुप्पट

उध्दव पाटील

सांगली : राज्यात एडिस एजिप्टाय डासांचा डंख वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी डेंग्यू रुग्ण दहाव्या महिन्यातच दुप्पट झाले आहेत. चिकुनगुनिया रुग्णसंख्याही वाढली आहे. झिकाचाही प्रादूर्भाव आढळू लागला आहे. या सर्व आजारांना प्रतिबंध करणारा, नियंत्रण ठेवणारा राज्यभरातील हिवताप विभाग मात्र अधिकारी, कर्मचार्‍यांच्या रिक्त पदांमुळे व्हेंटिलेटरवर आहे. अधिकारी, कर्मचार्‍यांची तब्बल 48 टक्के पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम डेंग्यू, चिकुनगुनियाच्या प्रतिबंध, नियंत्रणावर होत आहे.

गेल्या वर्षी 1 जानेवारी ते 14 ऑक्टोबर 2022 अखेर रुग्णसंख्या 6 हजार 548 होती. यावर्षी 1 जानेवारी ते 14 ऑक्टोबर 2023 या कालावधीत रुग्णसंख्या तब्बल 12 हजार 455 पर्यंत गेली आहे. गेल्या वर्षी डेंग्यूने मृत्यूंची संख्या 24 होती. यावर्षी मात्र ती 2 इतकी आहे.
डेंग्यू रुग्णसंख्या वाढ झालेल्या जिल्ह्यांमध्ये सिंधुदूर्ग (485), कोल्हापूर (423), नागपूर (388), पालघर (368), सातारा (262), यवतमाळ (247), गोंदिया (176), रत्नागिरी (170), गडचिरोली (166), सोलापूर (159) यांचा समावेश आहे. डेंग्यू रुग्णसंख्या वाढ झालेल्या महापालिकांमध्ये मुंबई (4003), नागपूर (767), नाशिक (554), ठाणे (301), कल्याण (281), अमरावती (227), कोल्हापूर (193), सांगली (191), पिंपरी-चिंचवड (178), सोलापूर (176) यांचा समावेश आहे. 1 जानेवारी ते ऑक्टोबर 2022 अखेर चिकुनगुनिया रुग्ण संख्या 899 होती. यावर्षी 1 जानेवारी ते 14 ऑक्टोबर 2023 या कालावधीत 909 झाली आहे. चिकुनुनिया वाढ झालेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे (92), सिंधुदूर्ग (66), कोल्हापूर (63), बीड (50), अमरावती (43), अकोला (43), उस्मानाबाद (30), गोंदिया (24), वाशिम (21), सोलापूर (18) यांचा समावेश आहे. रुग्णसंख्या वाढ झोलल्या महापालिकांमध्ये मुंबई (169), कोल्हापूर (69), सांगली (42), अमरावती (22), पिंपरी-चिंचवड (22), अकोला (21), सोलापूर (16), नांदेड (10), लातूर (5), नागपूर (4) यांचा समावेश आहे.

सांगली जिल्हा एक दृष्टिक्षेप

जानेवारी ते सप्टेंबर 2023 : डेंग्यू : ग्रामीण भाग- 44, नगरपालिका क्षेत्र- 5, महापालिका क्षेत्र- 176,
जानेवारी ते डिसेंबर 2022 : डेंग्यू : ग्रामीण भाग- 92, नगरपालिका क्षेत्र- 0, महापालिका क्षेत्र- 79,
जानेवारी ते सप्टेंबर 2023 : चिकुनगुनिया : ग्रामीण भाग- 10, नगरपालिका क्षेत्र- 2, महापालिका क्षेत्र- 34
जानेवारी ते डिसेंबर 2022 : चिकुनगुनिया : ग्रामीण भाग- 30, नगरपालिका क्षेत्र- 1, महापालिका क्षेत्र- 20
रिक्त पदे : आरोग्य कर्मचारी- 46, क्षेत्रीय कर्मचारी- 5, आरोग्य निरीक्षक- 15, आरोग्य पर्यवेक्षक- 7, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी- 26, सहायक जिल्हा हिवताप अधिकारी-1, जिल्हा हिवताप अधिकारी- 1 (अतिरिक्त कार्यभार)

राज्यात यावर्षी शहरी भागात विशेषतः महापालिकांच्या क्षेत्रामध्ये 63 टक्के रुग्ण संख्या आढळून येत आहे. राज्यामध्ये डेंग्यू रुग्णांचे स्क्रिनिंग (चाचणी) वाढलेले आहे. मृत्यू संख्येमध्ये मात्र घट दिसून येत आहे.
– डॉ. प्रतापसिंह सारनिकर
सहसंचालक हिवताप, हत्तीरोग विभाग

राज्यभरात यावर्षी थांबून थांबून पाऊस येत आहे. पाण्याने साचून राहिलेली डबकी ही डासांची उत्पत्ती स्थाने आहेत. डासांच्या उत्पत्ती स्थानामध्ये वाढ झाली आहे. परिणामी डेंग्यू रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.
– डॉ. महेंद्र जगताप
राज्य कीटकशास्त्रज्ञ, पुणे

राज्यात हिवताप विभागाकडे कर्मचारी, अधिकार्‍यांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. विभागाकडील रिक्त पदांपैकी 70 टक्के पदे ही पदोन्नतीने भरायची आहेत. राज्य शासनाच्या 29 सप्टेंबर 2021 च्या अधिसूचनेत पदांची शैक्षणिक पात्रता, अटी, निकष बदलले आहेत. त्यामुळे पदोन्नती होईना झाली आहे. रिक्त पदे वाढत आहेत. शासनाने 2021 ची अधिसूचना रद्द करावी. संघटनेला विश्वासात घेऊन नवीन अधिसूचना काढावी.
– विजय मोहरकर,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघ

Back to top button