स्वच्छ गावांसाठी, विकासासाठी स्पर्धा करा : पालकमंत्री सुरेश खाडे | पुढारी

स्वच्छ गावांसाठी, विकासासाठी स्पर्धा करा : पालकमंत्री सुरेश खाडे

सांगली, पुढारी वृत्तसेवा : स्वच्छता अभियानामुळे अनेक गावे सुधारली. गावे स्वच्छ आणि नीटनेटकी झाली पाहिजेत, ही भूमिका घेऊन जिल्ह्यातील गावांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला पाहिजे. गावांच्या विकासासाठी गावा-गावांत स्पर्धा निर्माण करा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींचा आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्काराने शुक्रवारी सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, कार्यकारी अभियंता भारती बिराजे, संजय येवले, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, सरपंच, सदस्य आणि ग्रामसेवक उपस्थित होते.

केवळ निवडणुकीत स्पर्धा ठेवा

खा. पाटील म्हणाले, जेवढे लहान गाव, तेवढी निवडणुकीत चुरस निर्माण होते, परंतु निवडणुकीनंतर मतभेद विसरून एकत्र काम करावे. गावांतील स्पर्धा निवडणुकीपुरती मर्यादित ठेवा. सरकारने स्मार्ट ग्रामचे आर. आर. पाटील सुंदर गाव स्पर्धा नामांतर केले, त्यामुळे सरकारचे कौतुक केले पाहिजे.

आ. सुमन पाटील म्हणाल्या, यापूर्वी अंजनीपुरते मर्यादित असलेले आबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून राज्याचे आबा बनले. आबांनी सुरू केलेले अभियान संपूर्ण राज्यात नव्हे, देशात पोहोचले. अभियानामुळे गावात असलेले तंटे विसरून लोक एकत्र आले, ही अभिमानाची बाब आहे.

या गावांचा झाला सन्मान…

नांगोळे (ता. कवठेमहांकाळ), कर्नाळ (ता. मिरज), वांगी (ता. कडेगाव), ढवळेश्वर (ता. खानापूर), शिरगाव (ता. तासगाव), सांडगेवाडी (ता. पलूस), फाळकेवाडी (ता. वाळवा), बोरगाव (ता. कवठेमहांकाळ), पद्माळे (ता. मिरज), नागेवाडी (ता. खानापूर), पाडळीवाडी (ता. शिराळा), हिवतड (ता. आटपाडी), कौलगे (ता. तासगाव), खंडोबाचीवाडी (ता. पलूस), रावळगुंडवाडी (ता. जत), मिरजवाडी (ता. वाळवा).

Back to top button