Sangli Crime News: महिलेबद्दल अश्लिल स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाचा खून; कवठेमहांकाळमध्ये ७ दिवसांनी मिळाला मृतदेह | पुढारी

Sangli Crime News: महिलेबद्दल अश्लिल स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाचा खून; कवठेमहांकाळमध्ये ७ दिवसांनी मिळाला मृतदेह

कवठेमहांकाळ : पुढारी वृत्तसेवा : महिलांच्या फोटोखाली आक्षेपार्ह मजकूर लिहून व्हॉटस् ॲपच्या स्टेटसला ठेवणे, तसेच अश्लिल मेसेज मोबाईलवर पाठविणे, याचा राग मनात धरुन कवठेमहांकाळ शहरातील पाच जणांनी सुशिल सुर्यकांत आठवले (वय २३) या तरुणाचा अपहरण करुन लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण करत खून केला होता. पोलिस पथकांच्या अथक शोधानंतर तब्बल सातव्या दिवशी आज (दि.१०) सुशिल याचा मृतदेह लंगरपेठ (ता. कवठेमहांकाळ) च्या हद्दीत बोगद्यातून गेलेल्या म्हैसाळ योजनेच्या कालव्यात सापडला. (Sangli Crime News)

याप्रकरणी पाच संशयित आरोपी यापूर्वीच अटकेत आहेत. पण आणखी काही जणांचा गुन्ह्यामध्ये समावेश असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. तपासात त्यांची नावे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर पण खुनाचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी दिली आहे. (Sangli Crime News)

कवठेमहांकाळ शहरामधील एका २३ वर्षीय तरुणाचा खून करुन मृतदेह म्हैसाळ योजनेच्या कालव्यात टाकण्यात आला आहे, अशी चर्चा बुधवारी (दि. ४) कवठेमहांकाळ शहरासह तालुक्यात सुरु झाली होती. दरम्यानच्या काळात कवठेमहांकाळ येथील चैतन्य नामदेव माने, सुनिल मारुती माने या दोघांनी गुरुवारी (दि. ५) स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांसमोर हजर होत आपण खून केला असल्याची कबुली दिली. परंतु मृतदेह सापडला नसल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला नव्हता.

हेही वाचा 

Back to top button