विसर्जन मिरवणुकीवेळी मिरज येथे एकाचा मृत्यू | पुढारी

विसर्जन मिरवणुकीवेळी मिरज येथे एकाचा मृत्यू

मिरज, पुढारी वृत्तसेवा : मिरजेत सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत अज्ञाताचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत त्याची ओळख पटली नव्हती. त्याच्या मृत्यूला डीजेचा आवाज तसेच मिरवणुकीतील धामधूम कारणीभूत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मिरजेत विसर्जनावेळी पोलिसांचा तराफा तलावात उलटला. सर्व पोलिसांना पोहता येत असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अनंत चतुर्दशीनिमित्त मिरजेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींची विसर्जन मिरवणूक पार पडली. यावेळी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या एका 55 वर्षे व्यक्तीचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. दरम्यान, त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झाले नसले, तरी संबंधित व्यक्तीचा मृत्यू डॉल्बीच्या दणदणाटामुळे झाला की अन्य काही कारणामुळे झाला हे सर्व शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी सांगितले.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या हस्ते आरती करून मिरज शहर पोलिस ठाण्याच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक निघाली. नियमांचे पालन करून वाद्यांच्या निनादात ही मिरवणूक पार पडली. यावेळी मिरवणुकीत पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, मिरज शहर पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह अधिकारी कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता.

तीन तासानंतर पोलिसांच्या गणरायांचे मिरजेतील गणेश तलावात विसर्जन करण्यात आले. परंतु गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर परतत असताना गर्दी झाल्याने तराफा उलटला. यामुळे तराफ्यावरील सर्व पोलिस तलावात कोसळले. सर्व पोलिसांना पोहता येत असल्याने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

मिरजेतील मिरवणुकीसाठी पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली 4 पोलिस उपअधीक्षक, 12 पोलिस निरीक्षक, 63 सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, 565 पोलिस कर्मचारी, 250 होमगार्ड आणि 250 स्वयसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती .

Back to top button