sangli News : ‘डीजे’ ने घेतले सहाजणांचे बळी | पुढारी

sangli News : ‘डीजे’ ने घेतले सहाजणांचे बळी

सचिन लाड

सांगली :  सांगली, मिरजेसह जिल्ह्यात ‘डीजे’ची ‘क्रेझ’ वाढत असली तरी याचा धोकाही प्रचंड वाढला आहे. ‘डीजे’च्या तालावर नृत्य करताना तरुणांचे बळी जात आहेत. गेल्या चार-पाच वर्षांत एका शाळकरी मुलासह सहाजणांचा ‘डीजे’च्या आवाजाने बळी घेतला आहे.

आवाज वाढव रे…!

सण, उत्सव लग्नामध्ये बँजो, बॅण्डची पसंती कमी झाली आहे. लाखो रुपयांची ‘सुपारी’ देऊन ‘डीजे’ सांगितला जात आहे. ‘डीजे’ वाजविण्यास बंदी नाही. मात्र, यासाठी आवाज मर्यादा निश्चित करून देण्यात आली आहे. त्याचे मात्र ‘डीजे’ ऑपरेटरकडून पालन केले जात नाही. कार्यकर्तेही आवाज वाढव रे, असा दमच देतात. ‘डीजे’च्या तालावर नाचत बेधुंद तरुणांना अक्षरक्ष: दम भरतो. लहान मुले, आजारी रुग्ण, वृद्धांना याचा नाहक त्रास होत आहे.

लाखो रुपयांचा चुराडा!

जिल्ह्यात लहान-मोठी साडेचार हजारहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. दोन हजार मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी ‘डीजे’ ठरविला. यासाठी लाखो रुपयांचा चुराडा करण्यात आला. या पैशातून गावात एखादे विकासाचे काम करता आले असते.

सहा जणांचा बळी

कवलापूर (ता. मिरज) येथे 12 वर्षाचा मुलगा विसर्जन मिरवणूक पाहण्यास गेला होता. आवाजाने त्याला हृदयविकाराचा धक्का आला. रुग्णालयात नेण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. पाच वर्षांपूर्वी ही घटना घडली. तत्पूर्वी बुधगाव कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्यांचाही अशाप्रकारे मृत्यू झाला. कुपवाड, तासगाव येथेही दोघांचा बळी गेला. दोन दिवसापूर्वी कवठेएकंद व बोरगाव येथे दोघांचा मृत्यू झाला.

कानाला कानठळ्या!

‘डीजे’च्या आवाजामुळे कानठळ्या बसतात. किमान दोन तास तरी कानाला ऐकू येत नाही. हृदयाचे ठोके वाढतात. छातीत अस्वस्थता जाणवते. सर्वात जास्त जन्मलेली मुले, आजारी रुग्ण व वृद्धांना याचा आवाज सहन होत नाही. गल्लीतून जरी मिरवणूक निघाली तर घरातील भांडी पडतात, इतका त्याचा भयानक आवाज आहे.

जप्तीची कारवाईच नाही

आवाजाची मर्यादा ओलांडणार्‍या मंडळांवर कारवाई करण्याचे पोलिस धाडस का करीत नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आवाज तपासणीसाठी ध्वनिमापक यंत्रे आहेत. त्याचाही वापर केला नाही. पोलिसांनीच बघ्याची भूमिका घेतल्याने ‘डीजे’चा दणदणाट सुरूच आहे.

लेसर शो, स्मोक मशीन, पेपर ब्लॉस्टचे फॅड

डीजेबरोबर अलिकडे पेपर ब्लास्ट, स्मोक मशीन, लेसर शोचे फॅड वाढले आहे. पेपर ब्लास्टचा कचरा डोकेदुखी ठरत आहे. लेसर शोमधील तीव्र किरणामुळे अनेकांनी दृष्टी गमवावी लागली आहे. काहींना अल्प अंधत्व आले आहे. स्मोक मशीनच्या धुरामुळेही अनेकांना श्वसनाचा त्रास वाढत आहे. तसेच दमा व त्वचा विकार वाढत आहेत.

एसपी दिलीप सावंत यांची आठवण

तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख दिलीप सावंत यांची सांगलीत तीन वर्षांची कारकीर्द झाली. त्यांनी उत्सवात कधीच ‘डीजे’ लावून दिला नाही. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना नमते घ्यावे लागले होते. आता शासनानेच परवानगी दिली असल्याने आम्ही तर काय करणार, असे पोलिस सांगत आहेत.

‘डायल 112’… दहा मिनिटांत पोलिस हजर

नागरिकांच्या मदतीसाठी शासनाने ‘डायल 112’ हा क्रमांक सुरू केला आहे. मोबाईलवरून डायल केला तरी तो लागतो. तुमच्या तक्रारीची तातडीने दखल घेतली जाते. मदतीसाठी दहा मिनिटात पोलिस पोहोचतात. ‘डीजे’ चा त्रास होत असेल तर या क्रमांकावर संपर्क साधायला हवा.

जल, जंगल, जमिनीची अतोनात हानी

बहुतांश उत्सव काळात पैसा, वेळ, क्रयशक्तीबरोबर प्रदूषणाने पर्यावरणाचीही अतोनात हानी होते. हवा, पाणी, ध्वनी प्रदूषणाने जल, जंगल, जमिनीचे प्रचंड नुकसान होते. प्रदूषणामुळे संसर्गजन्य व अन्य रोगांच्या प्रसाराचे प्रमाणही वाढते. याबाबत पर्यावरणतज्ज्ञ सातत्याने धोक्याचे इशारे देत आहेत, पण लक्ष कोण देतो…?

लेसर शो, स्मोक मशीन, पेपर ब्लॉस्टचे फॅड

डीजेबरोबर अलिकडे पेपर ब्लास्ट, स्मोक मशीन, लेसर शोचे फॅड वाढले आहे. पेपर ब्लास्टचा कचरा डोकेदुखी ठरत आहे. लेसर शोमधील तीव्र किरणामुळे अनेकांनी दृष्टी गमवावी लागली आहे. काहींना अल्प अंधत्व आले आहे. स्मोक मशीनच्या धुरामुळेही अनेकांना श्वसनाचा त्रास वाढत आहे. तसेच दमा व त्वचा विकार वाढत आहेत.

Back to top button