Sangli News | आई-वडिलांना सांभाळा, अन्यथा वारस नोंद नाही, नरवाड ग्रामसभेचा महत्त्वपूर्ण ठराव | पुढारी

Sangli News | आई-वडिलांना सांभाळा, अन्यथा वारस नोंद नाही, नरवाड ग्रामसभेचा महत्त्वपूर्ण ठराव

बेडग : पुढारी वृत्तसेवा :  नरवाड (ता. मिरज) येथील ग्रामसभा झाली. यामध्ये तब्बल 26 विषयांना मंजुरी देण्यात आली. सरपंच मारुती जमादार यांनी ही माहिती दिली. आई- वडिलांना न सांभाळणार्‍या वारसांची नोंद शासन निर्णयानुसार रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला. (Sangli News)

ग्रामसभेसाठी दवंडीसह ऑनलाईन सभेची लिंक पाठवण्यात आली होती. अनेकांनी सभेत ऑनलाईन सहभाग घेतला. ऑफ व ऑनलाईन मिळून 1600 पेक्षा ग्रामस्थांनी सहभाग घेतला. यामुळे नरवाड ग्रामपंचायतीने ऑफलाईन, ऑनलाईन सभा घेऊन जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे.

26 विषय घेण्यात आले होते. हे सर्व विषय मंजूर केल्याचे ग्रामसेवक उज्ज्वला आवळे यांनी सांगितले. या सभेत प्रधानमंत्री आवास योजना, फटाके व प्लास्टिक मुक्त गाव, जनजीवन मिशन अंतर्गत नळ कनेक्शन जोडणी, गावातील अवैध धंदे बंद करणे, शेतपाणंद रस्त्यांची नोंद घेणे, गावरान, गावठाण हद्दीची मोजणी करणे, ग्रामसचिवालय बांधणे, विषय समिती, शांतता कमिटी निर्माण करणे, सुशिक्षित बेरोजगारांना युवक- युवतीसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारणे, आदी ठराव मंजूर केले. विषयपत्रिकेचे वाचन आवळे यांनी केले. उपसरपंच सतीशकुमार माळी, सर्व सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (Sangli News)

Back to top button