शिवछत्रपतींनी भोसल्यांचे राज्य नव्हे, रयतेचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले : शरद पवार | पुढारी

शिवछत्रपतींनी भोसल्यांचे राज्य नव्हे, रयतेचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले : शरद पवार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शिवछत्रपतींचे आयुष्य, त्यांचे चारित्र्य, प्रशासन, त्यांची दूरदृष्टी असा प्रत्येक पैलू थोर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य वेगळे होते. त्यांनी सामान्य माणसाला संघटित करून राज्य उभे केले. मरगळलेल्या मानसिकतेतून रयतेला बाहेर काढून त्यांच्यात तेज जागृत करण्याचे ऐतिहासिक काम त्यांनी केले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य भोसले यांचे राज्य म्हणून ओळखले न जाता हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य म्हणून ओळखले गेले. हेच शिवरायांचे मोठेपण आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले.

मुळशी येथील सह्याद्री प्रतिष्ठान व कृष्णा प्रकाशनातर्फे डॉ. सदानंद मोरे संपादित ‘शिवराज्याभिषेक-भारताच्या इतिहासातील असामान्य घटना’ या ग्रंथाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी पवार बोलत होते. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, खासदार श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, एमआयटीचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार आदी या वेळी उपस्थित होते. डॉ. मोरे यांना शिवस्वराज्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

पवार म्हणाले, शिवराज्याभिषेक ही देशाच्या इतिहासातील असामान्य घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याला लोकांची मान्यता होतीच. पण, त्या स्वराज्याला मान्यता मिळण्यासाठी राज्याभिषेकाची गरज होती. अनेकांनी राज्याभिषेकाला विरोध केला. त्यामुळे उत्तरेकडून काहींना बोलावून त्यांच्याकडून राज्याभिषेकाचे विधी करावे लागले. त्याला इंग्रजांसह अनेकांची उपस्थिती होती.
डॉ. दीक्षित म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे जगाच्या इतिहासातील असामान्य व्यक्तिमत्त्व आहे. इतिहास विवेकनिष्ठ पद्धतीने अभ्यासला पाहिजे. भावूक पद्धतीने तो अभ्यासला जाता कामा नये. इतिहास प्रेरक, विधायक, मूल्यात्मक, समाजहितैशी असला पाहिजे. यादृष्टीने आपण इतिहासाकडे पाहिले पाहिजे.

इतिहासातील प्रवाह बदलणारे छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत, असे सांगत डॉ. मोरे म्हणाले, शिवराज्याभिषेकावर अभ्यास करणार्‍या अनेक अभ्यासकांच्या लेखांचा ग्रंथात समावेश केला आहे. शिवराज्याभिषेक ही ऐतिहासिक घटना आहे. त्याकडे विविध दृष्टिकोनातून कसे पाहिले गेले, हे या ग्रंथातून समोर येते. महाराष्ट्रातल्या लोकांचे हे कर्तव्य आहे, की जेवढे होईल तितके आपण शिवजागर केला पाहिजे. डॉ. कराड आणि पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा :

चीनमध्ये मिठासाठी मारामारी! जाणून घ्या कारण

Remote control car : रिमोट कारचा प्रथम विश्वविक्रम, नंतर भयंकर स्फोट!

Back to top button