सांगली: पलूसमध्ये हरणाच्या शिंगाची तस्करी; एकास अटक | पुढारी

सांगली: पलूसमध्ये हरणाच्या शिंगाची तस्करी; एकास अटक

पलूस, पुढारी वृत्तसेवा: हरीण संवर्गातील प्राण्याच्या तोंडाच्या हाडासहीत दोन शिंगांची विना परवाना तस्करी करणाऱ्या एकास पलूस पोलिसांनी आज (दि.२६) दुपारी ३ च्या सुमारास अटक केली. रोहीत बाबूराव कांबळे, (वय ३३, रा. शिरशिंगे – कोयना वसाहत, पलूस) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोयना वसाहत पलूस येथे संशयित आरोपी कांबळे राहतो. तो येथील बंद अवस्थेत असलेल्या शाळेच्या गेट समोरील मोकळ्या जागेत हरीण जातीच्या वन्य प्राण्याची तोंडाच्या हाडासहित शिंगाची विक्री करणार असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहायक निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या पथकाने आज येथे छापा टाकला.

त्यावेळी कांबळे तस्करी करताना आढळून आला. त्याच्याकडून ५० हजार रुपये किंमतीची एका हरीण संवर्गातील वन्य प्राण्याच्या दात नसलेल्या तोंडाच्या १४ इंच लांब व ६ इंच रुंद फुटलेल्या अवस्थेतील हाडासहीत काळपट पांढरे रंगाचे प्रत्येकी ३१ इंच लांबीचे टोकदार व निमूळते असलेली दोन शिंगे मिळून आली. पोलिसांनी त्याला अटक केली असून सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. ही कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, दिलीप गोरे, प्रवीण मलमे यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजश्री दूधाळे करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button