सांगली : स्थानिक जलसंपदा विभागाचा गलथान कारभार; कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीचा आरोप | पुढारी

सांगली : स्थानिक जलसंपदा विभागाचा गलथान कारभार; कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीचा आरोप

विटा; पुढारी वृत्तसेवा : ऐन पावसाळ्यात कृष्णेचे पात्र सांगली जिल्ह्यात कोरडे पडले आहे, याला सर्वस्वी स्थानिक जलसंपदा विभागाचा गलथान कारभार जबाबदार आहे असा आरोप कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीने केला आहे. तसेच कोयना धरणातील ६७.७० टीएमसी पाण्याचे नियोजन केवळ कागदावरच करु नये, तर सत्य परिस्थिती लक्षात घेऊन नदीत पाणी सोडण्याचे नियोजन करा, अन्यथा पिके वाळून जातील, अशी मागणी आमदार अरुण अण्णा लाड यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

याबाबत सांगलीच्या कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीचे कार्याध्यक्ष आणि निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण आणि प्रभाकर केंगार यांनी आज (दि. २६) पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या कराड येथील कृष्णा पुलाजवळ १४ फूट ११ इंच आहे. त्या ठिकाणचा विसर्ग २४ हजार ३६७ क्यूसेक्स इतका आहे. तो विसर्ग गेला आठवडा भर कायम आहे. ते सर्व पाणी इस्लामपूर जवळच्या साटपेवाडी बंधाऱ्याजवळ अडवले गेले आहे. त्यामुळे तिथून पुढच्या सगळ्या नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. जलसंपदा विभागाने साटपेवाडी बंधाऱ्यातून तातडीने २ हजार क्यूसेक्सचा विसर्ग सुरू करावा. त्यामुळे सांगली कृष्णाची पाणी पातळी १० फूट राहील. सांगली जिल्ह्यात पाणी कमी पडणार नाही. तसेच रोगराई सुद्धा पसरणार नाही, वास्तविक आठवडाभरापूर्वीच जलसंपदा विभागाने या जिल्ह्यातील पाण्याची टंचाई सदृश परिस्थिती लक्षात घेता साटपेवाडी बंधाऱ्यात पाणीसाठा वाढवण्याची गरज नव्हती. परंतु नेहमीप्रमाणे जलसंपदा विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी गलथानपणा केला त्यामुळेच कृत्रिम पाण्याच्या टंचाईला सांगली जिल्ह्याला तोंड द्यावे लागत आहे असेही निवृत्त अभियंता दिवाण आणि केंगार यांनी म्हटले आहे.

Back to top button