सांगली : दारूसाठी पैसे न दिल्याने वृद्धाचा डोके ठेचून खून | पुढारी

सांगली : दारूसाठी पैसे न दिल्याने वृद्धाचा डोके ठेचून खून

सांगली, पुढारी वृत्तसेवा : दारूसाठी पैसे न दिल्याने वृद्धाचे डोके दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. सुनील श्रीरंग तरटे (वय 65, रा. राजगुरूनगर झोपडपट्टी, शनिवार पेठ, माधवनगर) असे मयताचे नाव आहे. कर्नाळ ते माधवनगर रस्त्यावरील कंजारभाट वस्तीजवळ शुक्रवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी विशाल अनिल देसाई (वय 23, रा. राजगुरूनगर झोपडपट्टी, शनिवार पेठ, माधवनगर) याला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सुनील तरटे यांचा मुलगा गणेश तरटे याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माधवनगरमधील राजगुरुनगर येथील झोपडपट्टीमध्ये मयत सुनील तरटे आणि विशाल देसाई राहतात. सुनील तरटे हे कर्नाळ-माधवनगर रस्त्यावरून कंजारभाट वस्तीजवळून शुक्रवारी रात्री चालत निघाले होते. त्यावेळी विशाल याने सुनील यांच्याकडे दारूसाठी पैशाची मागणी केली. परंतु सुनील यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. यावेळी संतापलेल्या विशाल याने सुनील यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. डोके पूर्णपणे ठेचले गेल्याने सुनील यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, याबाबत माहिती मिळाल्यानंतर उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देउन पाहणी केली. यावेळी विशाल याने खून केल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी आठ तासामध्ये त्याला अटक केली. विशाल याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठाविण्यात आली आहे. याप्रकरणी सहायक निरीक्षक सुशांत पाटील अधिक तपास करत आहेत.

Back to top button