सांगली : कॉलेज गाडीसाठी तुरचीच्या सरपंचांनी विद्यार्थ्यांसह काढला मोर्चा | पुढारी

सांगली : कॉलेज गाडीसाठी तुरचीच्या सरपंचांनी विद्यार्थ्यांसह काढला मोर्चा

तासगाव, पुढारी वृत्तसेवा : तुरची (ता. तासगाव) येथील शालेय विद्यार्थ्यांना नेण्यासाठी येणारी कॉलेज गाडी वेळेवर न आल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थींनीसह सरपंच विकास डावरे यांनी तब्बल दहा किलोमीटर पायपीट करुन चालत तासगाव बस स्थानकात जाऊन मोर्चा काढला. या पुढे काळात कॉलेज गाडी वेळेवर सोडण्याचे लेखी आश्वासन आगार प्रमुखांनी दिले, यानंतर हे आंदोलन पाठीमागे घेण्यात आले.

गुरुवारी सकाळी तुरची गावातील १०० पेक्षा जास्त विद्यार्थी- विद्यार्थिनी गावात बस थांब्यावर येऊन थांबले होते. निर्धारीत वेळत एस. टी. आलीच नाही. तब्बल तासभर वाट बघूनही कॉलेज गाडीच आली नाही. यामुळे विद्यार्थी संतप्त झालेले होते. याची माहिती मिळताच सरपंच विकास डावरे बस थांब्यावर आले. उपसरपंच सचिन चव्हाण यांच्यासह सदस्यांना बोलावून घेतले. आगार प्रमुखांशी संपर्क करुनही नेमकी एस. टी. कधी येणार याची शाश्वती मिळाली नाही. यामुळे वैतागलेल्या सरपंच विकास डावरे यांनी उपसरपंच, सदस्य आणि विद्यार्थ्यांसह चालत तासगावची वाट धरली.

सरपंचासह उपसरपंच सचिन चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सदाशिव खरात, सतिश पाटील, भाऊसाहेब खरात, अंकुश पाटील, शरद सातपुते, तसेच रोहित गलांडे, ओंकार पाटील, संकेत पाटील व ग्रामस्थांनी विद्यार्थी, विद्यार्थींनीसह तासगावच्या दिशेने चालायला सरुवात केली. सरपंच विकास डावरे सर्वांसह दहा ते बारा किलोमीटर पायी चालत तासगाव बस स्थानकात दाखल झाले. बस स्थानकासमोर रस्त्यावर बसून रास्ता रोको आंदोलन सुरु केले. यामुळे काही काळ एसटी आगारातील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. अखेर अधिका-यांनी वेळेत गाडी सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

हेही वाचंलत का?

Back to top button