‘अग्निशमन’ विभागाला लाचखोरीची ‘आग’ | पुढारी

‘अग्निशमन’ विभागाला लाचखोरीची ‘आग’

सांगली, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचा अग्निशमन विभाग लाचखोरीच्या आगीने काळवंडला आहे. प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारीच सव्वा लाखाची लाच घेताना रंगेहाथ सापडला. या प्रकाराने महापालिकेत खळबळ उडाली आहे. टक्केवारीचा विषय ताजा असताना लाचखोरीच्या प्रकाराने महापालिकेचा कारभार पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महापालिकेतील अनेक विभागांना टक्केवारी, लाचखोरी आणि घोटाळ्याची लागण झाली आहे. पाणी पुरवठा विभागाकडील पाणी बिलाचा अपहार चव्हाट्यावर आला. पथदिवे वीज बिल घोटाळ्याने तर कहर केला. नगररचना, बांधकाम, गुंठेवारी, आरोग्य व अन्य काही विभागांकडील टक्केवारी, कमिशन चर्चेत आहे. महापालिकेतील टक्केवारीचा बाजार दैनिक ‘पुढारी’ने चव्हाट्यावर आणला. त्याने महापालिका वर्तुळात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. हा विषय ताजा असतानाच अग्निशमन विभागातील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे.

फायर सिस्टिम बसविल्याच्या कामाचा अंतिम दाखला देण्यासाठी लाच स्वीकारताना महापालिकेचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी रंगेहात सापडले. लाचखोरीच्या या प्रकाराने महापालिकेच्या अग्निशमन विभागाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना कायद्यानुसार निवासी संकुले, व्यापारी संकुले, दवाखाने, कार्यालये यांच्या इमारतींना ना हरकत दाखला घ्यावा लागतो. या इमारतींचे बांधकाम सुरू असताना नाहरकत दाखल्यासाठी प्रस्ताव सादर होत असतात. अग्निशमन अधिकारी संबधीत इमारतीची पाहणी करून प्राथमिक दाखला देतात. इमारतीत आवश्यक आग सुरक्षा उपाययोजना करण्याबाबत सांगितले जाते. आग सुरक्षा यंत्रणा बसवल्यानंतर त्याचे प्रात्यक्षिक व सर्व उपाययोजना कार्यान्वित असल्याबाबतचा अंतिम दाखला दिला जातो. नाहरकत दाखला, आग सुरक्षा यंत्रणा नूतनीकरणाचा दाखला महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून दिला जातो. अपेक्षा पूर्ण केल्यानंतरच हे दाखले मिळतात, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

महापालिकेतील काही अधिकारी, कर्मचारी तसेच काही मानधनी कर्मचार्‍यांची संपत्ती त्यांच्या पगाराच्या उत्पन्नापेक्षा अधिक असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. पाणीपुरवठा, घरपट्टी, नगररचना विभागाकडील मानधनी कर्मचार्‍यांचा पगार आणि त्यांचे बंगले, मोटारी यांचा विषयही पुन्हा चर्चेत आला आहे. वादग्रस्त अधिकारी, कर्मचार्‍यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

अग्निशमन अधिकारी विजय पवार होणार निलंबित

फायर सिस्टिम बसविल्याच्या कामाच्या अंतिम दाखल्यासाठी एका कंपनीकडून 1.25 लाख रुपये लाच घेतल्याप्रकरणी महापालिकेचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार यांना अटक झाली आहे. दोन दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे. पोलिसांचा अहवाल प्राप्त होताच निलंबनाची कारवाई होईल, असे महापालिका प्रशासनातून सांगण्यात आले.

Back to top button