सांगली : राजारामबापू बँकेची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार : प्रा. शामराव पाटील | पुढारी

सांगली : राजारामबापू बँकेची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार : प्रा. शामराव पाटील

इस्लामपूर : पुढ‍ारी वृत्तसेवा : सांगली येथील व्यापारी पारेख यांच्या खात्यांच्या चौकशीसाठी ईडीचे पथक राजारामबापू बँकेच्या प्रधान शाखेत आले होते. त्यांना हवी ती माहिती बँकेने दिली आहे. यामध्ये काहीही संशयास्पद आढळलेले नाही. ही वस्तुस्थिती असताना काहीजण खोट्या बातम्या पसरवून आ. जयंत पाटील व बँकेला नाहक बदनामी करीत आहेत. अशा लोकांच्या‍वर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी पत्रकार बैठकीत बोलताना सांगितले.

प्रा. शामराव पाटील यावेळी म्हणाले की, बँकेच्या स्थापनेला ४२ वर्षे झाली आहेत. रिझर्व बँकेचे पुर्ण नियंत्रण या बँकेवर आहे. वर्षाला रिझर्व बँकेची तपासणीही होते. बँकेचा कारभार पुर्णपणे पारदर्शक आहे. आ. जयंत पाटील कधीही बँकेच्या कारभारात लक्ष घालत नाहीत. तरीही आज काहीजण आ. जयंत पाटील व बँकेला बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे बँकेबाबत ग्राहकांच्यात चुकीचा संदेश जात आहे.

आजपर्यंत बँकेत कोणताही अनियमीत व्यवहार झालेला नाही. कोणतेही खाते संशयास्पद नाही. तपासणीत पथकाला काहीही संशयास्पद आढलेले नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांनीही याबाबत काहीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. असे असताना काही माध्यमांनी खोडसाळपणे बातम्या देवून बँकेची नाहक बदनामी केली जात आहे. त्यामुळे संबंधितांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही ते यावेळी म्हणाले आहेत. तर बँकेचे अधिकारी, संचालक उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button