यवतमाळ : खुनाच्या दोन घटनांनी जिल्हा हादरला; चार संशयित ताब्यात | पुढारी

यवतमाळ : खुनाच्या दोन घटनांनी जिल्हा हादरला; चार संशयित ताब्यात

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ शहरातील खुनाच्या घटनांचे सत्र थांबायला तयार नाही. शुक्रवारी (दि.२३) रोजी सकाळी नागपूर बायपासवर वाघापुरातील तरुणाचा मृतदेह रक्ताने माखलेला अवस्थेत सापडला. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेला. तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे चौघेही अल्पवयीन असल्याची माहिती समजते.

पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. रोशन ऊर्फ ज्ञानेश्वर मस्के (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. लोहारा पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वाघापूर पिंपळगाव येथील तो रहिवासी आहे. गुरुवारी रात्री मित्रांसोबत रोशन हा हळदी समारंभासाठी गेला होता. समारंभ आटोपून सर्व मित्र रात्रीच आपापल्या घरी परतले. मात्र, रात्री उशीर झाला तरी ज्ञानेश्वर मस्के घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी नागपूर महामार्गावरून जाणाऱ्या रस्त्याच्या दाट झाडीत ज्ञानेश्वर मस्के यांचा मृतदेह पडलेला दिसला.

शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदेहाची ओळख पटविली. शहर पोलिसांनी वेगवेगळी पथके पाठवून मारेकऱ्यांचा शोध सुरु केला. त्याचवेळी पोलिसांनी चार संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नंदकिशोर पंत करीत आहेत.

धारधार शस्त्राने महिलेचा खून

आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे छातीवर धारधार शस्त्राने सपासप वार करून विधवेचा खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. सुनीता दत्ता मुधळकर (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे.

सुनीता ही विधवा आहे. तिला दोन विवाहित मुली आणि एक मुलगा आहे. मुली आपल्या घरी सासरी असून मुलगा मुंबईत काम करण्यासाठी गेला आहे. त्यामुळे सुनीता एकटीच बोरगाव येथे वास्तव्याला आहे. ती दगड फोडण्याचे काम करते. गुरुवारी ती लगतच्या पांगरी येथे दगड फोडण्यासाठी गेली होती. काम आटोपून ती सायंकाळी घरी परतली होती. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास तिची हत्या करण्यात आली.

तिच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांना संशय आहे. मात्र, त्याच्या घराला कुलूप होते. पोलिसांनी कुलूप तोडून त्याच्या घरातून मोबाईल, एक तलवार, धारदार सुरा जप्त केला. खून करण्यापूर्वी संशयिताने सुनीतासोबत अनैतिक कृत्य केल्याचाही पोलिसांना संशय आहे. घटनास्थळी पोलिसांनी श्वान पथक बोलावले होते. ते संशयिताच्या घराजवळ घुटमळत होते. त्या संशयिताचे शेजारील दुसऱ्या महिलेसोबत भांडण झाले होते. त्याची पत्नी १५ दिवसांपूर्वी आईच्या गावी निघून गेली आहे. पत्नी घरी नसल्याने त्याने मृत सुनीतासोबत जबरीने ‘अनैतिक कृत्य करून तिचा खून केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

हेही वाचा : 

Back to top button