सांगली : निवडीवरून काँग्रेस, राष्ट्रवादीत वाद | पुढारी

सांगली : निवडीवरून काँग्रेस, राष्ट्रवादीत वाद

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती दुय्यम बाजार आवार उपसमित्यांच्या सभापती व सदस्य निवडीसाठी संचालक मंडळाची सोमवारी बैठक झाली. त्यात मिरज दुय्यम बाजार आवार सभापतिपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आग्रह धरला. याबाबत रात्री उशिरापर्यंत संचालकात खल सुरू होता. मात्र, एकमत झाले नाही. त्यामुळे निवडीविना बैठक स्थगित करण्यात आली.

दरम्यान, पदाधिकारी निवडीवरून काँग्रेस- राष्ट्रवादीतील मतभेद पहिल्याच बैठकीत चव्हाट्यावर आले आहेत. सांगली बाजार समितीवर दोन वर्षे प्रशासकाच्या कालावधीनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व माजी मंत्री अजितराव घोरपडे गट हे एकत्र आले. त्यात महाविकास आघाडीची सत्ता एकतर्फी आली. सत्ता आल्यानंतर पहिल्या टप्प्यात आ. विक्रम सावंत यांच्या गटाचे सुजय शिंदे यांना सभापतिपदाची संधी मिळाली आहे. तर उपसभापतिपदी माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे रावसाहेब पाटील यांना संधी मिळाली. सभापतिपदासाठी अनेकजण इच्छुक होते. मात्र, नेत्यांनी शिंदे यांचे नाव निश्चित केल्यानंतर त्याला सर्वांनी संमती दिली. मात्र उपसभापतिपदासाठी चुरस झाली होती. आमदार सुमनताई पाटील यांच्या गटाच्या सदस्यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, चर्चेतून अर्ज मागे घेण्यात आला. त्यामुळे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. आज दुय्यम बाजार आवार व उपसमित्यांच्या सभापती व सदस्य निवडीसाठी बैठक दुपारी आयोजित केली होती. मिरज, कवठेमहांकाळ, जत हे दुय्यम बाजार आवार व विष्णूअण्णा फळ मार्केट हे महत्त्वाचे मानले जातात. या पदासाठी सभापतीस केबिन, दिमतीला कर्मचारी असतात. त्यामुळे या पदासाठी अनेक संचालक इच्छुक होते.

चर्चेत पहिल्या टप्यातच जतची जागा काँग्रेसला तर कवठेमहांकाळची राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. मात्र मिरज सभापतिपदावरून उशिरापर्यंत खल सुरू होता. समितीत काँग्रेसचे 7 , राष्ट्रवादीचे 6 तर घोरपडे गटाचे 2 सदस्य आहेत. सभापतीपद काँग्रेसला तर उपसभापतीपद घोरपडे गटाला मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने मिरज सभापतीपद मिळाले पाहिजे यासाठी आग्रह धरला. त्याचवेळी काँग्रेसनेही या पदासाठी आग्रह धरला. त्यामुळे दुपारी 2 वाजता सुरु झालेली बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. रात्री उशिरापर्यंत निवडीवर एकमत झाले नाही. त्यामुळे आजच्या निवडी स्थगित करण्यात आल्याचे सभापती शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, पदाधिकारी निवडी स्थगित करण्याची वेळ आल्याने दोन्ही पक्षातील मतभेद व धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

नाराज संचालक बैठकीतून गेले

संचालक मंडळाची दुपारी बैठक सुरू झाल्यानंतर सभापती शिंदे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांचे निर्णय बैठकीत सांगितले. मात्र, काही संचालकांना हे निर्णय आवडले नाहीत. त्यामुळे ते बैठकीतून निघून गेले.

पाच वर्षे एकत्रित कारभार कसा करणार

बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्रित आले. मात्र आता पदासाठी यांच्यात पहिल्याच बैठकीत वाद सुरू झाले आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्षे ते एकत्रित कसा कारभार करणार, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

बाजार समितीत काँग्रेसचे 7 , राष्ट्रवादीचे 6, तर घोरपडे गटाचे 2 सदस्य आहेत. सभापतीपद काँग्रेसला तर उपसभापतीपद घोरपडे गटाला मिळाले आहे. त्यामुळे आता मिरज दुय्यम बाजार आवार समितीचे सभापतीपद राष्ट्रवादीला मिळाले पाहिजे. यात आमचे चुकीचे काहीही नाही.
– अविनाश पाटील, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Back to top button