इस्लामपूर : बनावट संदेशाला बळी पडू नका | पुढारी

इस्लामपूर : बनावट संदेशाला बळी पडू नका

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : वीज ग्राहकांच्या थकीत असलेल्या वीज बिलाचा फायदा उठवत आता बनावट एमएमएस किंवा व्हॉट्सअ‍ॅप पाठवत ग्राहकांची फसवणूक होत आहे. महावितरण असे कोणतेही मॅसेज पाठवत नाही. त्यामुळे वीज बिलासंदर्भात आलेले मॅसेजसह मोबाईल क्रमांक आल्यास सावध रहा. वीज ग्राहकांनी बनावट संदेशाला बळी पडू नका, असे आवाहन येथील उपकार्यकारी अभियंता राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.

सूर्यवंशी म्हणाले, प्रिय ग्राहक तुमचे मागील महिन्याचे वीज बिल भरलेले नाही. तुमचा वीजपुरवठा आज खंडीत केला जाणार आहे. कृपया आमच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधा, असे आवाहन करणारा मॅसेज आता वीज ग्राहकांना येण्यास सुरू झाले आहे. काही दिवसापूर्वी येथील एका ग्राहकाची बनावट संदेशाद्वारे आर्थिक फसवणूक झाली होती. वास्तविक पाहता असा कोणताही मॅसेज वीज वितरण महामंडळाकडून पाठवला जात नाही.

ओटीपी विचारला की शंका घ्या…

महावितरणकडून जो ग्राहकांना मॅसेज पाठवला जातो. त्यामध्ये पाठवणार्‍याच्या नावात स्पष्टपणे एमएसएलडीसीएल असा कंपनीचा उल्लेख असतो. महावितरण कंपनी कधीही खासगी नंबरवरून एमएमएस किंवा व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर संदेश पाठवत नाही. तसेच वीज बिलासाठी कोणत्याही अधिकार्‍याशी संपर्क साधण्यास सांगत नाही. कोणालाही फोनवरून ओटीपी विचारला जात नाही. ओटीपी विचारला की शंका घ्या, असे सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

Back to top button