सांगली : पीएम किसान सन्मान योजनेत विस्कळीतपणा | पुढारी

सांगली : पीएम किसान सन्मान योजनेत विस्कळीतपणा

इस्लामपूर; मारूती पाटील : केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी सुरू केलेल्या पीएम किसान योजनेत विस्कळीतपणा आला आहे. अनेक शेतकर्‍यांना या योजनेंतर्गत मिळणारा लाभ बंद झाला आहे. शिवाय संबंधित विभागाचे पोर्टलही बंद असल्याने याबाबत नेमकी चौकशी कुठे करायची, हेही शेतकर्‍यांना समजनासे झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात संभ्रमावस्था आहे.

केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी महिना 500 रु. पेन्शन सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना तीन हप्त्यात वर्षाला 6 हजार रुपये बँक खात्यावर वर्ग केले जातात. फेब्रुवारी महिन्यातच या योजनेचा 13 वा हप्ता वर्ग करण्यात आला आहे. याचा लाखो शेतकरी लाभ घेत असून यामुळे अनेक गरीब शेतकर्‍यांना आर्थिक हातभार लागला आहे. आता ज्या शेतकर्‍यांनी केवायसी पूर्ण केली नाही, त्यांचा लाभ बंद करण्यात येणार होता. तर केवायसी पूर्ण करुनही अनेक शेतकर्‍यांना लाभ मिळणे बंद झाले आहे. केवायसी पूर्ण केल्यापासून काही शेतकर्‍यांंचे पैसे वेगवेगळ्या बँक खात्यात जमा होवू लागले आहेत. यातून नाराजीचा सूर उमटत आहे.

Back to top button