सांगली : ‘श्रीपती शुगर’ कडून १५ फेब्रुवारी पर्यंतची ऊस बिले जमा | पुढारी

सांगली : 'श्रीपती शुगर' कडून १५ फेब्रुवारी पर्यंतची ऊस बिले जमा

जत; पुढारी वृत्तसेवा : डफळापूर (ता.जत ) येथील श्रीपती शुगर अँण्ड पाँवर लिमिटेड या साखर कारखान्याने ऊसाचे बिल एकरकमी संपूर्ण रक्‍कम २८०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. भविष्यात देखील दुष्काळी जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादित ऊसाला जास्तीत जास्त दर देण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री व श्रीपती शुगरचे चेअरमन आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी केले. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, कारखान्याचे जनरल मॅनेजर महेश जोशी, मुख्य शेती अधिकारी हनमंत धारीगौंडा, केन अकौंटट संजय सुतार यांच्यासह कारखाना कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आमदार कदम म्हणाले की, गळीत हंगाम सन २०२२-२३ साठी डफळापूर येथील श्रीपती शुगर अँण्ड पावर लिमिटेड या साखर कारखान्याला ज्या शेतकऱ्यांचा ऊस १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत गाळपास पाठविला आहे. त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्‍कम जमा करण्यात आली आहे. संबधीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपले बँक खाते चेक करावे. चाचणी हंगामातच कारखाना शेतकऱ्यांच्या व प्रशासनाच्या विश्वासास पात्र ठरला आहे, असे ते म्हणाले.

कारखान्याचे कार्यकारी संचालक महेंद्र लाड म्हणाले की, शेतकऱ्यांनी ऊसाचे उत्पादन व साखर उतारा अधिक देणाऱ्या को-८६०३२, एसएनके-९२२७, व्हीएसएल ८००५ या ऊसाच्या जातीच्या बेण्याची लागवड आगामी काळात आपल्या शेतामध्ये करावी. शेतकऱ्यांना कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत तज्ञांचे मार्गदर्शन करण्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांचे मेळावे घेतले जाणार आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा व येणाऱ्या हंगामात आधिकाधिक ऊस श्रीपती शुगरला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करत शेतकऱ्यांच्या उत्कर्षात श्रीपती शुगर नेहमीच अग्रेसर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या उत्पादित ऊसाला जास्तीत जास्त दर देण्याचा मानस आहे. श्रीपती शुगर कारखाना दुष्काळी जत तालुक्याचा मानबिंदू ठरेल. जेणेकरून शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल घडेल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button