सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील पाच दरोडेखोर सांगलीत जेरबंद | पुढारी

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील पाच दरोडेखोर सांगलीत जेरबंद

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, इचलकरंजी येथील पाच दरोडेखोरांना जेरबंद करण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला बुधवारी यश आले. यामध्ये तीन सराईत गुन्हेगारांसह पाच जणांचा समावेश आहे. त्यांच्याकडून हरिपूर (ता. मिरज) येथे दि. 31 डिसेंबर 2022 रोजी दोन तरुणींना लुटलेल्या गुन्ह्याचा छडा लागला आहे. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अटक केलेल्यांमध्ये खलील राजू हुंडेकर (वय 20, तकवाह मशिदजवळ, कबनूर, इचलकरंजी), नौशाद करीम मुजावर (23, इंदिरा कॉलनी, जवाहरनगर पोलिस चौकीजवळ, कबनूर), निखील शंकर पाटील (19, यशवंत कॉलनी, पाटील मळा, कबनूर), नईम हसन कोकटनूर (27, जवाहरनगर, लिंगाडे मळा, सोमनाथ गल्ली, इचलकरंजी) व आयुब अहमद आत्तार (20 केटकाळनगर, कबनूर) यांचा समावेश आहे. याच पाचपैकी तिघांविरूद्ध मारामारीसह अन्य गुन्हे कोल्हापूर पोलिसांच्या दप्तरी नोंद आहेत. त्यांना पुढील तपासासाठी सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक मोबाईल, छर्‍याचे पिस्तूल व दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
दि. 31 डिसेंबर रोजी नेहा भूषणसिंग नगरकर (वय 21, रा. वारणाली) ही तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत हरिपूर येथे कृष्णा-वारणा नदीच्या संगमावर फिरायला गेली होती. दोघीही मोबाईलवर फोटो काढत होत्या. त्यावेळी हे संशयित पाच जण तिथे गेले. त्यांनी या दोघींना धमकावून त्यांच्याकडून दोन मोबाईल काढून घेऊन पलायन केले होते. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होता. जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्याचा आदेश दिला होता. मात्र ग्रामीण पोलिसांना छडा लावता आला नाही.

पोेलिस निरीक्षक सतीश शिंदे यांचे पथक बुधवारी विश्रामबागहद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी दोन संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील चौंडेश्वरी फाटा येथे चोरीतील मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून शाहरुख हारूण पाटील (वय 28, केसरगल्ली, त्रुंबे, ता. राधानगरी) व साजीद अस्लम गैबाण (वय 23 रा., काँग्रेस कमिटीमागे, इचलकरंजी) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतल्यानंतर दोन मोबाईल सापडले. चौकशीत त्यांनी इचलकरंजी येथील पाच जणांकडून हे मोबाईल घेतल्याचे सांगितले. त्यांची नावेही त्यांनी सांगितली. पथकाने या पाच जणांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी हरिपुरात दोन तरुणींना लुटल्याची कबुली दिली. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, हवालदार चेतन महाजन, हेमंत ओमासे, दीपक गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button