सांगली : ‘सिव्हिल’मध्ये रुग्णाचा शस्त्रक्रिया करताना मृत्यू | पुढारी

सांगली : ‘सिव्हिल’मध्ये रुग्णाचा शस्त्रक्रिया करताना मृत्यू

सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात संदीप भाविमणी (वय 32) या रुग्णाचा मृत्यू झाला. बुधवारी हा प्रकार घडला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम कांबळे यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठातांकडे केली आहे .

संदीप भाविमणी हा कुपवाड येथे आनंदनगरमध्ये राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्याला खांदेदुखीचा त्रास सुरू होता. दोन दिवसांपूर्वी ते शासकीय रुग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करायला लागेल, असे सांगितले. बुधवारी सकाळी त्यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी घेण्यात आले होते. या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व भूल अधिक प्रमाणात दिल्याने मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून संबधित डॉक्टरांना निलंबित करावे, अशी मागणी नातेवाईक व कांबळे यांनी केली. यासंदर्भात त्यांनी अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांना निवेदनही दिले आहे. या प्रकारानंतर नातेवाईकांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Back to top button