सांगली : साडेआठ लाखांच्या चोरीचा छडा | पुढारी

सांगली : साडेआठ लाखांच्या चोरीचा छडा

विटा : पुढारी वृत्तसेवा :  पंधरा दिवसांपूर्वी विट्यातील साडेआठ लाखांच्या चोरीचा छडा लावण्यात विटा पोलिसांना यश मिळाले. याप्रकरणी अभिजित वसंत ठोंबरे (वय २२, रा. मंजुनाथ निवास चाळ मुंढे मळा, विटा) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, ३० डिसेंबर ते १ जानेवारी या काळात विट्यातील यशवंतनगर येथील तेजस गिरीधर तारळेकर यांच्या घराचे बंद कुलूप तोडून, तिजोरी फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली होती. याबाबत २ जानेवारी रोजी विटा पोलिसात गुन्हा नोंद झाला होता. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र चव्हाण हे आपल्या सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना एक व्यक्ती संशयितरित्या फिरताना दिसली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो विट्यातील रहिवाशी असल्याचे सांगितले.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याला विटा पोलिस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखवताच त्याने विट्यातील तारळेकर यांच्या घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २८१.०२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि ४३९. १३ ग्रॅम वजनाचे चांदीचे असे मिळून एकूण ८ लाख ५७ हजार २१५ रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत.

Back to top button