कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस इलेक्ट्रिक इंजिनवर विजेवर धावण्यास सुरुवात | पुढारी

कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस इलेक्ट्रिक इंजिनवर विजेवर धावण्यास सुरुवात

मिरज; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस इलेक्ट्रिक इंजिनवर (विजेवर) धावण्यास सुरुवात झाली आहे. कोयना, चालुक्य आणि एलटीटी एक्स्प्रेसनंतर आता महालक्ष्मी एक्स्प्रेस देखील विजेवर धावत आहे. यामुळे दररोज चार ते पाच हजार लिटर डिझेलची बचत होणार आहे.

पुणे -मिरज -लोंढा रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणासह विद्युतीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत मिरज ते पुणे आणि मिरज ते कोल्हापूर दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेस कोल्हापूर ते मुंबई दरम्यान विजेवर धावण्यास सुरुवात झाली आहे.

मिरज ते बेळगाव दरम्यान दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचे काम रखडल्याने कोल्हापूर- तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस सध्या कोल्हापूर ते मिरज दरम्यान विजेवर धावणार आहे. ही एक्स्प्रेस मिरजेतून बेळगावकडे डिझेल इंजिनने रवाना होणार आहे.

सध्या जुन्या मार्गावरील पुणे ते कोल्हापूर दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावर हुबळी ते एलटीडी एक्स्प्रेस, चालुक्य एक्सप्रेस या दोन गाड्या मिरजेतून तर कोल्हापूर -मुंबई कोयना एक्स्प्रेस विजेवर धावत होत्या. त्यानंतर आता महालक्ष्मी एक्सप्रेस देखील विजेवर सोडण्याचा रेल्वेकडून निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दि. 1 पासून मुंबई ते कोल्हापूर आणि दि. 2 पासून कोल्हापूर ते मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस विजेवर सुरू करण्यात आली आहे.

दररोज चार-पाच लाख बचत

महालक्ष्मी एक्स्प्रेस कोल्हापूर ते मुंबई दरम्यान चार ते पाच हजार लिटर डिझेल लागत होते. आता डिझेलची बचत होणार आहे. त्यामुळे एका महालक्ष्मी एक्स्प्रेसचा दररोजचा चार ते पाच लाख रुपयांचा रेल्वेवरील ताण आता कमी होणार आहे.

महाराष्ट्र एक्स्प्रेस लवकरच विजेवर

कोल्हापूर- गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस सध्या कोल्हापूर ते पुणे दरम्यान डिझेल इंजिन वर धावत आहे. व पुण्यातून ही एक्स्प्रेस इलेक्ट्रिक इंजिनवर धावत आहे. मिरज रेल्वे स्थानकास आणखीन एक इलेक्ट्रिक इंजिन प्राप्त झाल्यास ही एक्सप्रेस देखील लवकरच कोल्हापूर ते पुणे दरम्यान इलेक्ट्रिक इंजिनवर धावण्याची शक्यता आहे.

Back to top button