सांगली : जिल्ह्यात ४०० कोटीचा घोटाळा; तपास कागदावरच ! | पुढारी

सांगली : जिल्ह्यात ४०० कोटीचा घोटाळा; तपास कागदावरच !

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  वेगवेगळ्या नावांनी जिल्ह्यात रातोरात दाखल झालेल्या विविध बोगस कंपन्यांनी वर्षभरात दामदुप्पट, परदेशी सफर, बक्षिसांची खैरात अशी अनेक आमिष दाखवून जिल्ह्यात केलेला सुमारे ४०० कोटी रुपयांचा घोटाळा पोलिस दप्तरी नोंद आहे. फसवणुकीची ही मालिका गेल्या २० वर्षापासून सुरू आहे.  पोलिसांचा तपास मात्र कागदावरच राहत आहे.

जिल्ह्यात फसवणुकीचे जवळपास ६४ गुन्हे दाखल झाले आहेत. २५२ ठकसेनांना अटक करण्यात आली. मात्र ते जामिनावर बाहेर येऊन आजही उजळमाथ्याने फिरत आहेत. गुंतवणूकदार मात्र पैसे परत मिळावेत, यासाठी न्यायालयाचे उंबरे झिजवत आहेत. घर, शेतावर कर्ज उचलून, दागिने गहाण ठेऊन लोकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. कमी कालावधीत दामदुपटीचे आमिष दाखवून फसवणुकीचा नवा फंडा गेल्या काही वर्षात नव्याने सुरू झाला आहे. स्थानिक एजंटांची साखळी तयार करून त्यांना आकर्षक पगारासह घसघसशीत कमिशन दिले जाते. स्थानिक एजंटावर विश्वास ठेऊन जिल्ह्यातील लाखो लोकांनी पैशाची गुंतवणूक केली.

फाळकूटदादांची कुमक आणि राजकीय आश्रयांचा फायदा घेऊन अनेक ‘व्हाईट कॉलर ‘वाल्यांनी लोकांना अलगदपणे टोपी घातली. अलिशान बंगले बांधले. शेती, प्लॉटमध्ये गुंतवणूक केली. कंपनीची अलिशान कार्यालये थाटून वर्ष-दोन वर्षात काही प्रमाणात गुंवणूकदारांना या ठकसेनांनी लाभही दिला. कोट्यवधी रुपयांचा धंदा करून त्यांनी रातोरात गाशा गुंडाळून पलायन केले. बँका, पतसंस्था, शैक्षणिक गृहनिर्माण, गुंतवणूक रकमेला परतावा, असे आमिष दाखवून जिल्ह्यातील शेतकरी, सर्वसामान्य उच्चशिक्षितांना गंडा घालणाऱ्या अनेक कंपन्या पोलिसांच्या रडार’वर आल्या आहेत. ऑनलाईनद्वारे, व्हॅट टॅक्स चुकवेगिरी, कडकनाथ कोंबडी पालन, खणकाम व्यवसाय व शेअर्स मार्केट, संचयनी, एस. एम. ग्लोबल, कोल्ट स्टोअरेज, जमीन खरेदी अशा अनेक पद्धतीने झालेली आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात आहे. अजूनही लोकांना गंडा घालणाऱ्या भामट्या कंपन्या सक्रिय आहेत.

लोकांना झटपट श्रीमंत होण्याची हाव, तसेच त्यांनी कंपन्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे आर्थिक फसवणुकीच्या त्रासाला सामोरे जावावे लागत आहे. घोटाळ्यांची मालिका सुरुच आहे. आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे. मात्र तपास कागदावरच रहात आहे. गुंतवणूकदारांना एक रुपयाची परत मिळलेला नाही.

Back to top button