सांगली : तासगाव तालुक्यात चुरशीने ७९.६४ टक्के मतदान | पुढारी

सांगली : तासगाव तालुक्यात चुरशीने ७९.६४ टक्के मतदान

तासगाव, पुढारी वृत्तसेवा : तासगाव तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत रविवारी ७९.६४ टक्के मतदान झाले. एकूण ५९ हजार ९८३ मतदारांपैकी ४७ हजार ७६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २४ हजार ७९९ पुरुष तर २२ हजार ९३८ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

या निवडणूकीमध्ये चुरशीने मतदान झाले. नागेवाडी येथे वादावादीचा झालेला एक प्रकार वगळता सर्व निवडणूक प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले.

सकाळपासून उमेदवारांसह त्यांचे कार्यकर्ते मतदान केंद्र परिसरात ठिय्या मारुन बसल्याचे चित्र २४ गावात पाहायला मिळाले. तालुक्यात मणेराजुरी, सावर्डे, वायफळे, कुमठे, वासुंबे, मतकुणकी, बस्तवडे, बलगवडे या मोठ्या गावात मतदारांची ने -आण करण्यासाठी चढाओढ पहायला मिळत होती.

आमदार सुमन पाटील, युवा नेते रोहित पाटील, आर आर आबांच्या मातोश्री भागिरथी, बंधू सुरेश पाटील आणि राजाराम पाटील यांनी अंजनी गावात मतदानाचा हक्क बजावला.

सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग अतिशय कमी होता. सकाळी साडेनऊ पर्यंत तालुक्यात फक्त १३ टक्के मतदान झाले. साडेनऊ पर्यंत ५ हजार २१२ पुरुष आणि ३ हजार ३४ अशा ८ हजार २४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

दुपारी मतदानाचा वेग वाढला होता. दीड वाजेपर्यंत ५१ टक्के मतदान झाले. १५ हजार ८९५ पुरुष तर १५ हजार १६६ स्त्रिया अशा एकून ३१ हजार ६१ मतदारांनी दीड वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला.

दुपारनंतर मतदानाचा वेग चांगलाच वाढला. साडेतीन वाजेपर्यंत ६८ टक्के मतदान झाले. २० हजार ९९४ पुरुष आणि २० हजार ४४८ स्त्रिया अशा ४१ हजार ४४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७९.६४ टक्के मतदान झाले.

महसूल उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण, निवडणूक नायब तहसिलदार नागेश गायकवाड, आचारसंहिता कक्षाचे प्रमुख तथा गट विकास अधिकारी अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्रिय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, यांच्या तत्परतेमुळे किरकोळ अपवाद वगळता निवडणूक शांततेत पार पडली.

तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलिस निरीक्षक भाणूदास निंभोरे यांच्यासह सर्वच पोलिसांनी मतदान केंद्र परिसरात चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे नागेवाडीचा अपवाद वगळता कोणताही अनुचित प्रकार न होता २४ ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान पार पडले.

हेही वाचा…

Back to top button