सांगली जिल्ह्यात १८ महिलांची फसवणूक; देवदर्शन सहलीचा बहाणा | पुढारी

सांगली जिल्ह्यात १८ महिलांची फसवणूक; देवदर्शन सहलीचा बहाणा

सांगली : पुढारी वृत्तसेवा : देवदर्शनाची सहल काढतो, असा बहाणा करून सांगली जिल्ह्यातील १८ महिलांची पाच लाख २९ हजार चारशे रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी परेश सुभाष गुजर (वय ४५, रा. नानावाडा, गंजपेठ, पुणे) याच्या विरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत भोसे (ता. मिरज) येथील धनश्री रामचंद्र कुंभार यांनी फिर्याद दाखल केली आहे. संशयित गुजर याची पुण्यात इंडिया चारधाम टूर नावाची कंपनी आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याने केदारनाथ व बद्रीनाथ येथे देवदर्शनासाठी सहल काढण्याची जाहिरात केली. फिर्यादी धनश्री कुंभार यांनी गुजर याच्याशी संपर्क साधला. सहलीसाठी गुजरने विमान प्रवास व रोड ट्रान्स्पोर्टसाठी ३२ हजार २६ हजार रुपये भाडे सांगितले. कुंभार यांच्यासह १९ महिला देवदर्शनाच्या सहलीला जाण्यास तयार झाल्या.

दि. १७ जून ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत त्याने महिलांना भाड्याची रक्कम मोबाईलवर गुगल- पे करण्यास सांगितले. काही महिलांनी ३२ हजार तर काहींनी २६ हजार पाचशे रुपये त्याच्या अकाऊंटवर टाकले. एकूण पाच लाख २९ हजार चारशे रुपये त्याला दिले, पैसे देऊन सहा महिने होऊ गेले तरी गुजरने महल काढली नाही. त्यामुळे महिलांनी त्याच्याकडे पैसे परत देण्याची मागणी केली. पण तो टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे महिलांनी फिर्याद दाखल केली आहे. गुजरला पैसे दिलेले पुरावेही महिलांनी पोलिसांना सादर केले आहेत.

Back to top button