सांगली : इस्लामपूर येथे नातवानेच आजोबांचा खून केल्याचे उघड | पुढारी

सांगली : इस्लामपूर येथे नातवानेच आजोबांचा खून केल्याचे उघड

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा :  पेठकर कॉलनीमधील हंबीरराव शंकर साळुंखे (वय 80) या वृद्धाच्या खुनाचा छडा लावण्यात सांगलीच्या गुन्हे अन्वेषण पथकाला यश आले आहे.पथकाने संशयित विशाल गुलाबराव साळुंखे (वय 24, रा. फार्णेवाडी) याला 24 तासांत अटक केली. हंबीरराव यांचा विशाल हा चुलत नातू आहे. सावकारीचे कर्ज भागविण्यासाठी हंबीरराव यांनी पैसे न दिल्याने संशयित विशालने त्यांचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

येथील पेठकर कॉलनीत सोमवारी सकाळी हंबीरराव साळुंखे यांचा डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. बेडरूममध्ये हंबीरराव यांचा मृतदेह त्यांच्या बेडच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यांच्या डोक्यात लोखंडी हत्याराने अनेक वार केल्याने डोक्यावर खोलवर जखमा झाल्या होत्या. गळफासाचा बनाव करण्यासाठी त्यांच्या गळ्यात सुती दोरी बांधली होती. मृतदेहाच्या बाजूलाच लोखंडी झारा, लाटणे पडले होते.

खुनाची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर पोलिस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील चौधरी, सागर टिंगरे, सचिन धोत्रे, कुबेर खोत, चेतन महाजन, संदीप नलवडे, पवन सदामते, संकेत कानडे, सत्या पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. नातेवाईकांकडे चौकशी केली. विशाल हा हंबीरराव यांच्याकडे येत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने संशयित विशाल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विशाल याचे कापड दुकान होते. तो व्यवसायात आतबट्ट्यात आला होता. त्याने सावकारांचे कर्ज घेतले होते. सावकारांनी पैशांसाठी तगादा लावला होता. तीन-चार दिवसांपूर्वी विशाल हा हंबीरराव यांच्याकडे आला होता. त्यांनी हंबीरराव यांच्याकडे पैसे मागितले होते. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. शनिवारी विशाल याने हंबीरराव यांच्या पत्नीला फोन केला होता. त्यावेळी त्यांनी मी मुंबईत असल्याचे फोनवरून सांगितले होते. हंबीरराव घरी एकटेच होते.

रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हंबीरराव हे जेवण करून बसले होते. त्यावेळी संशयित विशाल हा घरी गेला. त्यांनी हंबीरराव यांना पैशाची मागणी केली. त्यावेळी दोघांमध्ये वादावादी झाली. विशाल याने दोरीने त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये झटापट झाली. विशाल याने तेथे पडलेला लोखंडी झारा, लाटण्याने हंबीरराव यांच्या डोक्यात मारहाण केली. मारहाणीत हंबीरराव यांच्या डोक्यात खोलवर जखमा झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. संशयित विशाल याने दाराला कडी घालून मोटारसायकलवरून पलायन केल्याचे पोलिसांनी सांगितले. सांगलीच्या गुन्हे अन्वेषण पथकाने 24 तासात संशयित विशाल याला ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मंगळवारी संशयित विशाल याला घटनास्थळी नेण्यात आले. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

 

Back to top button