म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत विस्तारीत योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळावी: संजय पाटील | पुढारी

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत विस्तारीत योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळावी: संजय पाटील

जत,पुढारी वृत्तसेवा : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत जत विस्तारीत योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी खा. संजय पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या मागणीला फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जत तालुक्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. तसेच म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत विस्तारीत योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेसंदर्भात निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली, अशी माहिती प्रकाश जमदाडे यांनी दिली आहे.

जमदाडे म्हणाले, खा. संजय पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा कायमस्वरुपी दुष्काळग्रस्त आहे. १९९५ पासूनची मूळ म्हैसाळ योजना अजूनही अपूर्ण आहे. जत तालुक्यातील ४८ गावे पुर्णतः व १७ गावे अंशतः पाण्यापासून आजही वंचीत आहेत. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून २०१९ मध्ये अंकलगी येथे विस्तारित योजना कशी असेल हे प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवण्यात आले होते. यावेळी तत्कालीन आमदार विलासराव जगताप उपस्थित होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने आले असता विस्तारित योजनेस मान्यतेबाबत तसेच विस्तारित योजनेला लवकरच प्रशासकीय मंजुरी देऊन काम सुरू होईल अशी ग्वाही त्‍यांनी दिली.

दरम्यान विस्तारित म्हैसाळ योजना मार्गी लागावी म्हणून सातत्याने पाठपुरावा केला होता. १ जानेवारी २०२० व १ फेब्रुवारी २०२१ रोजी जत प्रांत कार्यालयासमोर उपोषणही करण्यात आले होते. यानंतर जत तालुक्यातील ६५ गावांकरीता विस्तारीत योजनेसाठी एकूण रुपये १९२८ कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे.

सदर विस्तारीत योजना झालेस जत तालुक्यातील ६५ गावे कायमस्वरुपी दुष्काळ व चारा छावणी मुक्त होणार असून तालुक्यातील पूर्व भागासाठी ही योजना वरदान ठरणार आहे. त्यामुळे कृष्णा-कोयना उपसा सिंचन प्रकल्पासाठी एकूण ८१६१ कोटी साठी ५ व्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेबाबत लवकरात लवकर कार्यवाही होवून योजना लवकरच कार्यांवित होईल. त्या अनुषंगाने सदर योजनेच्या पुर्णत्वासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

हेही वाचा

जळगावी शेतकऱ्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण

ना. गिरीश महाजन : खडसे यांनी दूध संघात निवडून येऊन दाखवावे

रत्नागिरी: रिफायनरीबाबत सरकार जनतेसोबत : एकनाथ शिंदे

Back to top button