सांगली, डफळापुरात 5 पिस्तूल जप्त; दोघांना अटक | पुढारी

सांगली, डफळापुरात 5 पिस्तूल जप्त; दोघांना अटक

सांगली : पुढारी वृत्तसेवा : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सांगली व डफळापूर (ता. जत) येथे छापे टाकून पाच पिस्तूल व आठ जिवंत काडतुसे जप्त केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली आहे. या प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन तपास केला जाईल, असे जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी सांगितले. अतुल रमेश चंदनशिवे (वय 36, रा. बेळुंकी, ता. जत, सध्या संजयनगर, सांगली) व विजयकुमार ऊर्फ अक्षय शंकर चव्हाण-पाटील (26, डफळापूर)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

चंदनशिवे याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन काडतुसे जप्त केली आहेत. त्याची किंमत 51 हजार रुपये आहे. चव्हाणकडून देशी बनावटीचे दोन पिस्तूल, दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे जप्त केली आहेत. जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी बेकायदा हत्यार बाळगणार्‍यांचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांचे पथक शहरात गस्त घालत होते. त्यावेळी अक्षय चव्हाण-पाटील हा विश्रामबाग रेल्वे स्थानकाजवळ पिस्तूल व गावठी कट्टे विकण्यास येणार्‍या असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याला सापळा रचून पकडले. अगंझडती घेतल्यानंतर पिस्तूल, गावठी कट्टे व
काडतुसे सापडली. ही शस्त्रे कोणाकडून आणली, याबद्दल त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली.

डफळापूर येथे करण्यात आलेल्या कारवाईत चंदनशिवे हा पिस्तूल व काडतुसे विक्री करण्यासाठी गावामध्ये ग्राहक शोधत असल्याची
माहिती मिळाली. पथकाने त्याला डफळापूरच्या बसस्थानकाजवळ पकडले. त्याची अंगझडती घेतल्यानंतर पिस्तूल व काडतुसे सापडली. चव्हाण-पाटील व चंदनशिवे या दोघांविरूद्ध बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी संजयनगर व जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चव्हाण-पाटील याच्याविरूद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदा हत्यार बाळगणे, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार, हवालदार आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, मेघराज रुपनर, निलेश कदम, राजू मुळे, संदीप नलवडे, हेमंत ओमासे, रुपेश होळकर, सुनील जाधव, कॅप्टन गुंडवाडे, ऋषीकेश सदामते, संकेत कानडे, कुबेर खोत, बाळासाहेब सुतार, दीपक गायकवाड, प्रकाश पाटील, संजय कांबळे, सुरेखा कुंभार, शुभांगी मुळीक, स्नेहल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मुळापर्यंत तपास केला जाईल : डॉ. तेली

पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली म्हणाले, अटकेतील दोन संशयितांकडे कसून चौकशी केली जात आहे. त्यांनी पिस्तूल कोठून आणले होते, ते कोणाला विकणार होते का, त्याचा कुठे वापर करणार होते, या सर्व बाबींचा तपासातून उलगडा केला जाईल. मुळापर्यंत जाऊन या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आहेत.

Back to top button