सांगली : देवाला सारं कळतंय रं..! … रोहित पाटलांच्या व्हॉटस्अ‍ॅप स्टेटसबाबत चर्चेला उधाण | पुढारी

सांगली : देवाला सारं कळतंय रं..! ... रोहित पाटलांच्या व्हॉटस्अ‍ॅप स्टेटसबाबत चर्चेला उधाण

तासगाव; पुढारी वृत्तसेवा :  कवठेमहांकाळ नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादीमध्ये शिजत असलेली डाळ अखेर शुक्रवारी उतू गेली. रोहित पाटील गटाचे चार उमेदवार फुटून विरोधी गटाला सामील झाले आणि सत्तांतर झाले. खासदार संजय पाटील गटाच्या सिंधुताई गावडे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. तत्पूर्वी गुरुवारी रोहित आर. आर. पाटील यांनी व्हॉटस्अ‍ॅप सोशल मीडियामध्ये ठेवलेल्या स्टेटसमध्ये ‘देवाला सारं कळतंय रं…’ हे शाहीर बापू जाधव यांनी गायलेले लोकगीत ठेवून आपली उद्विग्नता दाखवून दिली होती. हे गाणे आणि त्यानंतर अवघ्या चोवीस तासांत लागलेला निकाल याची चर्चा तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात दिवसभर होती.

19 जानेवारी 2022 मध्ये कवठेमहांकाळ नगरपंचायतमध्ये रोहित पाटील विरुध्द सर्व गट अशी निवडणूक दिसून आली. यावेळी रोहित पाटील यांनी आघाडी करण्याचा वरिष्ठांचा निर्णय डावलून स्वतःचे अस्तित्व सिध्द करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, आर. आर. पाटील यांचे नाव आणि भावनिकतेची दखल घेवून जनतेनेही त्यांच्या झोळीत भरभरुन मते टाकली. एकहाती सत्ता दिली. मात्र रोहित पाटील यांना अवघ्या 9 महिन्यांत सत्ता गमावण्याची वेळ आली. त्यामुळे त्यांनी आणखी अभ्यास करणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया राजकीय जाणकारांतून येत आहेत.

Back to top button