सांगली : मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेचे कडे तोडून जावू नये – दीपक केसरकर | पुढारी

सांगली : मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेचे कडे तोडून जावू नये - दीपक केसरकर

सांगली;  पुढारी वृत्तसेवा :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नक्षलवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर आहेत. त्यांना आम्ही सुरक्षेचे कडे तोडून गर्दीत जाऊ नका, त्यांनी सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी, अशी नेहमी विनंती करीत असतो, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. सुरक्षेच कवच सोडून गर्दीत गेल्यामुळे आपण दोन पंतप्रधानांना गमावले आहेत, असेही केसरकर यांनी सांगितले.

केसरकर रविवारी सांगली दौर्‍यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, एकनाथ शिंदे हे पालकमंत्री असताना नक्षलवादी भागात त्यांनी बेधडक कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका आहे. ते सुरक्षेच कवच सोडून अनेकदा गर्दी जातात. तसे करू नका, असे आम्ही त्यांना सातत्याने सांगत आहे. ते लोकप्रिय आहेत. मात्र सुरक्षेबाबत त्यांनी खबरदारी घ्यायला हवी.
ते म्हणाले, वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करताना त्याला ‘क्लस्टर’चा पर्याय आहे. शाळा बंद करून त्या ऐवजी अन्य शाळेपर्यंत जाताना मुलांना वाहतूक खर्च देता येईल. प्रति विद्यार्थी खर्च मर्यादित असावा लागेलच; कारण बजेटचाही विचार करावा लागेल. कोणताही निर्णय घेताना सर्व बाबींचा विचार करून घ्यावा लागेल. गृृहपाठ सर्व विद्यार्थ्यांचा बंद करायचा नाही. पण जे हुशार आहेत, ज्यांचा बुद्ध्यांक जास्त आहे, अशा विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करावा लागेल.

संयमाने बोलणे, ही शरद पवार यांची शिकवण

केसरकर म्हणाले, संयमाने बोलायचे; आणि खरे आश्वासन द्यायचे. दिलेलं आश्वासन पूर्ण करायचे, असे आम्हाला शरद पवार यांनी शिकवलेले आहे.

Back to top button