सांगली : गाढवे चोरणारी टोळी सांगलीत जेरबंद | पुढारी

सांगली : गाढवे चोरणारी टोळी सांगलीत जेरबंद

सांगली;  पुढारी वृत्तसेवा :  सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातून गाढवे चोरणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात शहर पोलिसांना शनिवारी सकाळी यश आले. त्यांच्याकडून नऊ गाढवे व टेम्पो जप्त करण्यात आला आहे. टोळीमध्ये 15 जणांचा समावेश आहे. यातील चौघे हाती लागले आहेत. टोळीतील अन्य साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक सोलापूर जिल्हा व कर्नाटक राज्यात रवाना झाले आहे.

अटक केलेल्यांमध्तग रमेश परशू बजंत्री (वय 24), संगाप्पा उर्फ बाळू यमनाप्पा बजंत्री (26), बाळाप्पा उर्फ यमनाप्पा बजंत्री (25) व लक्ष्मण स्वामी गाणगेळ (32, चौघे रा. तेरदाळ, जि. बागलकोट, राज्य कर्नाटक) यांचा समावेश आहे. कोल्हापूर रस्त्यावरील कबाडे हॉस्पिटलजवळ या चौघांना पकडण्यात आले आहेत. गाढवांच्या मालकांना हा प्रकार समजताच ते तातडीने दाखल झाले. चोरलेली गाढवे टेम्पोत पाहून संतप्त जमावाने या चौघांना बेदम चोप दिला. त्यानंतर त्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात गाढवे पाळणारी खूप कुटुंबे आहेत. गाढवांचा वीटभट्टी, मुरूम टाकणे या कामासाठी उपयोग केला जातो. गाढवांना बांधून ठेवले जात नाही. त्यांना मोकळेच सोडले जाते. गेल्या पाच वर्षांपासून महापालिकाहद्दीतील गाढवे अचानक कमी होऊ लागली. गाढव मालकांनी अनेकदा पोलिस ठाण्यात तक्रारही केली होती. पण गाढवे चोरणार्‍या टोळीचा काहीच सुगावा लागत नव्हता.

शनिवारी पहाटे कबाडे हॉस्पिटलजवळ एक टेम्पो उभा होता. या टेम्पोत नऊ गाढवे होती. हा प्रकार गाढवे मालक अंकुश उर्फ पिंटू सुरेश माने (वय 35, रा. गावभाग, सांगली) यांना समजला. ते तातडीने कोल्हापूर हॉस्पिटलजवळ आले. तोपर्यंत माने यांच्या समाजातील लोकही जमा झाले होते. जमाव पाहून या चौघांनी टेम्पो घेऊन तेथून पलायन केले.

माने यांच्यासह काही लोकांनी टेम्पोचा पाठलाग केला. कोल्हापूर रस्त्यावर एका हॉटेलसमोर टेम्पो अडविण्यात आला. चौघांना बेदम चोप देण्यात आला. त्यांनी गावभाग परिसरातून गाढवे चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. गाढवे व टेम्पो जप्त करण्यात आला. गाढवे माने यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. त्यांचीच फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांची कसून चौकशी सुरू आहे.

‘अख्ख मार्केट आपले आहे आता…’

पोलिसांनी चारही संशयिताच्या मोबाईलची तपासणी केली. त्यावेळी एका संशयिताच्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ सापडला आहे. यामध्ये त्यांनी गाढवे विकल्यानंतर एका हॉटेलमध्ये बसून पैसे मोजले. त्यानंतर ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील ‘अख्ख मार्केट आपलं आहे आता’, असा ‘डॉयलॉग’ करून त्याचा व्हिडीओ बनविला आहे. हा व्हिडीओ सोलापूर जिल्ह्यात सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

सांगली, मिरजेतून दोन हजार गाढवे चोरीला

गेल्या पाच वर्षांपासून सांगली, मिरजेतून गाढवे चोरीला जात आहेत. जवळपास दोन हजारांहून गाढवे चोरीला गेली आहेत. गाढवे चोरणारी 15 जणांची टोळी आहे. सध्या चौघे सापडले आहेत. अन्य 11 पैकी सांगोल्यातील-1, मिरज-3, पंढरपूर-2, मोहोळ-1, माळशिरस-4 येथील आहेत. त्यांच्या शोधासाठी शहर पोलिसांची दोन पथके सोलापूर जिल्हा व कर्नाटकात राज्यात रवाना झाली आहेत.

Back to top button