सांगली महापालिका : स्थायी सभापती पदाची संधी काँग्रेसने दोनदा वाया घालवली | पुढारी

सांगली महापालिका : स्थायी सभापती पदाची संधी काँग्रेसने दोनदा वाया घालवली

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची संधी काँग्रेसने दोनदा वाया घालवली आहे. त्यामुळे यावेळी स्थायी सभापती पदाची उमेदवारी घेण्यापूर्वी काँग्रेसने बहुमताची जुळणी दाखवावी. जुळणी होत नसेल तर राष्ट्रवादीला उमेदवारी द्यावी, असे महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी सांगितले.

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात होत आहे. स्थायी समितीत भाजपचे संख्याबळ 9 आणि ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीचे संख्याबळ 7 आहे. आघाडीतील काँग्रेसकडे 4, तर राष्ट्रवादीकडे 3 सदस्य आहेत. काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे यांनी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे काँग्रेस लढवणार आहे. या निवडणुकीत चमत्कार दिसून येईल, असे काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे यांनी म्हटलेले आहे.

त्यावर राष्ट्रवादीचे गटनेते बागवान म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे सभापतीपदाची उमेदवारी काँग्रेसकडे आहे. मात्र काँग्रेसने यापूर्वी दोनदा ही निवडणूक लढवली. मात्र दोन्हीवेळा काँग्रेसला अपयश आले. काँग्रेसला बहुमताची जुळणी करता आली नाही. फेब्रुवारी 2021 च्या महापौर निवडणुकीत आघाडीतर्फे निवडणूक लढवताना राष्ट्रवादीने चमत्कार घडवून आणत यश मिळवले. पण त्यानंतर झालेल्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीची उमेदवारी काँग्रेसने घेतली, मात्र त्यांना बहुमत जमवताना अपयश आले. यावेळीही काँग्रेसचे गटनेते मेंढे यांनी सभापतीपदाच्या उमेदवारीवर हक्क सांगितला आहे. पण काँग्रेसने प्रथम बहुमताची जुळणी कशी होणार हे राष्ट्रवादीला सांगावे. जुळणी होत असेल तरच उमेदवारी घ्यावी, अन्यथा राष्ट्रवादीला उमेदवारीची संधी द्यावी. महापौर निवडणुकीप्रमाणे स्थायी समिती सभापती निवडणुकीतही राष्ट्रवादी चमत्कार घडवेल.

दरम्यान, दोन्ही पक्षांची निवेदने पाहता सभापती पदाच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्येच राजकारण रंगणार असल्याचे दिसत आहे.

Back to top button