सांगली : महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी कृती कार्यक्रम ठरवू | पुढारी

सांगली : महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी कृती कार्यक्रम ठरवू

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी कृती कार्यक्रम ठरवू. त्यानुसार कार्यवाही करू. सध्याच्या चांगल्या संकल्पना, उपक्रमांंना बळ देऊ. शहरासाठी चांगले करण्याचे प्रयत्न केले जातील. पदाधिकारी व प्रशासन यांच्यात समन्वय ठेवून कामकाज होईल. संभाव्य महापुराचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रभावीपणे करू, असे महापालिकेचे नूतन आयुक्त सुनील पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नूतन आयुक्त सुनील पवार यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सभागृह नेते विनायक सिंहासने, स्थायी समितीचे सभापती निरंजन आवटी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, भाजपचे नेते सुरेश आवटी, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, उपायुक्त राहुल रोकडे तसेच नगरसेवक, अधिकार्‍यांनी नूतन आयुक्त पवार यांचे स्वागत केले.
पवार म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेमार्फत दि. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यासाठी नागरिकांना तिरंगा ध्वज उपलब्ध केले जात आहेत. ‘माय सिटी, फिट सिटी’ ही संकल्पना दृढ करण्यासाठी मॅरेथॉन आयोजित केली आहे. योगासन प्रात्यक्षिके होणार आहेत. सफाई कामगार हे आरोग्य सैनिक आहेत. त्यांचा सत्कार केला जाणार आहे. विधवा महिलांना तिरंगा ध्वज वाटप, तिरंगा बोट रॅली, कबड्डी स्पर्धा, एरोमॉडेलिंग शो होणार आहे. महापालिकेने दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आयोजित केलेल्या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी व्हावे.

शहर राहण्यायोग्य करू आयुक्त पवार म्हणाले, महापालिकेच्यावतीने सध्या सुरू असलेल्या चांगल्या संकल्पनांना बळ दिले जाईल. काही त्रुटी असतील तर सुधारणा केल्या जातील. नवीन उपक्रम राबविले जातील. शहराच्या विकासासाठी प्रयत्न राहील. महापालिका क्षेत्रात रहावेसे वाटले पाहिजे यासाठी प्रयत्न करू.

नागरिकांना सुखी, समाधानी करू

महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांच्या शंभर टक्के अपेक्षा पूर्ण करता येणार नाहीत. पण त्यांना चांगल्या सेवा, सुविधा देण्याचा आटोकाट प्रयत्न राहील. जनतेचे सेवक म्हणून काम करताना त्यांची सेवा करू. नागरिकांना सुखी, समाधानी करण्याचा प्रयत्न करू. महापालिका क्षेत्राला चांगले करू. महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी कृती कार्यक्रम ठरवू व त्यानुसार प्रभावी अंमलबजावणी करू. पदाधिकारी- प्रशासन यांच्यात चांगला समन्वय राहील, असे आयुक्त पवार यांनी सांगितले.

पुराचे पाणी घरापर्यंत येण्याची वाट पाहू नका

नूतन आयुक्त सुनील पवार म्हणाले, संभाव्य महापुराचा यशस्वी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. पूरपट्ट्यातील नागरिकांनीही जीव धोक्यात घालू नये. पाणी घरापर्यंत येण्याची वाट न पाहता महापालिकेने केलेल्या सूचनांचे पालन करावे. निवारा केंद्रात स्थलांतर व्हावे अथवा स्वत:ची व्यवस्था असेल तर त्यानुसार स्थलांतर व्हावे.

Back to top button