सांगली : ‘बेशिस्त’ वाहनधारकांकडे साडेनऊ कोटींची थकबाकी | पुढारी

सांगली : ‘बेशिस्त’ वाहनधारकांकडे साडेनऊ कोटींची थकबाकी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील दोन लाख 44 हजार 371 बेशिस्त वाहनधारकांकडे सुमारे नऊ कोटी 35 लाख 91 हजार 250 रुपये दंडाची रक्कम थकीत आहे. यामध्ये दोन लाख 44 हजार 371 वाहनधारकांचा समावेश आहे.

दि. 12 ऑगस्टरोजी वाहनधारकांनी वाहतूक नियंत्रण शाखा व नजीकच्या पोलिस ठाण्यात दंडाची ही रक्कम भरावी, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांनी केले आहे. दि. 13 ऑगस्टपर्यंत दंड न भरल्यास लोकअदालतमध्ये जाऊन दंड भरून शासनाला सहकार्य करावे, असेही देशमुख यांनी आवाहन केले आहे. जिल्हा न्यायालयात लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे.

वाहन धारकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ऑनलाईन नोटिसा पाठवून देखील वाहनधारक त्याच्या वाहनावर असलेला प्रलंबित दंड वाहतूक शाखेत भरत नाहीत, असे निदर्शनास आले आहे. वाहनधारकांना मोबाईलवर संदेश पाठवून दंड पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे. पण तरीही अजूनही वाहनधारक दंड भरण्यास पुढे आले नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत लोकअदालत होणार आहे. यासाठी वकिलांचे पॅनेल, पोलिस उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यात 25 पोलिस ठाणी आहेत. याशिवाय सांगली, मिरजेत स्वतंत्र वाहतूक नियंत्रण शाखा आहेत. याशिवाय पोलिस ठाणे स्तरावर दोन-दोन वाहतूक पोलिस नियुक्त करण्यात आले आहेत. नाकाबंदी करून सातत्याने वाहनधारकांना अडविले जाते. त्यांच्याकडील वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाते.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनधारकांना पकडून जागेवर दंड वसूल केला जातो. पण अनेकदा पोलिसांनी थांबवूनही अनेक वाहनधारक पळून जातात. अशावेळी पोलिस मोबाईलवरून त्यांचा फोटो घेतात. हा फोटो तसेच ‘तुम्ही नियम तोडला आहे’, असा लेखी संदेश संबंधित वाहनधारकाच्या मोबाईलवर जातो.

या संदेशद्वारे त्याला दंड भरण्याची सूचना केली जाते. वाहनधारक दंड भरण्यास पुढे येत नसल्याने जिल्ह्यातील दोन लाख 44 हजार 371 बेशिस्त वाहनचालधारकांकडे सुमारे नऊ कोटी 35 लाख 91 हजार 250 रुपये दंडाची रक्कम थकित राहिली आहे. ही रक्कम त्यांच्याकडून तातडीने वसूल करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

दंड न भरल्यास आता न्यायालयात खटले

बेशिस्त वाहनधारकांना दंड भरण्यासाठी दि. 12 व 13 ऑगस्ट ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे. यातून त्यांनी दंड न भरल्यास त्यांच्याविरूद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे वाहनधारकांनी दंडाची ही रक्कम भरावी.

Back to top button