सांगली : सूर जुळणीसाठी जुळेना तारखेची तार | पुढारी

सांगली : सूर जुळणीसाठी जुळेना तारखेची तार

सांगली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांचे बेसूर झालेले सूर जुळावेत, यासाठी बोलवलेल्या बैठकीला नेत्यांची तारीख जुळली नाही. त्यामुळे बैठक लांबणीवर पडली आहे. आता ऑगस्टमध्ये बैठक होईल, असे संकेत मिळत आहेत.

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आहे. मात्र, कारभारात राष्ट्रवादीकडून विश्वासात घेतले जात नसल्याचा ‘राग’ काँग्रेस नगरसेवकांनी आळवला. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी नको, अशी भूमिकाही मांडली. काँग्रेस नगरसेवकांनी आळवलेल्या वेगळ्या रागाची दखल राष्ट्रवादीचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली. त्यांनी दोन्ही काँग्रेसचे नेते व नगरसेवक यांची शनिवारी दुपारी बारा वाजता बैठक बोलवण्याबाबत आपल्या पक्षाच्या पदाधिकार्‍यांना सूचना दिल्या. राष्ट्रवादीचे नेते एकच आहेत. त्यांनी त्यांचे पदाधिकारी, नगरसेवकांना शनिवारी दुपारी 12 च्या बैठकीचे निमंत्रण दिले. मात्र, काँग्रेसमध्ये चार नेते आहेत. माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे चारही नेते बैठकीला उपस्थित असणे महत्त्वाचे आहे. सर्वांची तारीख व वेळ जुळणे महत्त्वाचे होते. अन्य तीन नेत्यांची तारीख व वेळ जुळली. मात्र डॉ. कदम यांना या बैठकीला उपस्थित राहता येणार नसल्याचे शुक्रवारी रात्री उशिरा स्पष्ट झाले. काँग्रेस नेते डॉ. कदम हेच जर उपस्थित नसतील तर मग बैठकीला अर्थ काय, असा प्रश्न काँग्रेसमधून उपस्थित झाला. त्यामुळे काँग्रेसने शनिवारच्या बैठकीला उपस्थित राहणे शक्य नसल्याचे राष्ट्रवादीला कळवले.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील व काँग्रेस नेते डॉ. विश्वजीत कदम यांची दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. चर्चेचा तपशील समजू शकला नाही. दोन्ही काँग्रेसच्या नेते व नगरसेवकांची बैठक दि. 4 ते 5 ऑगस्टनंतर होईल, असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.

Back to top button