सांगली जिल्हा परिषद : आरक्षणामुळे कोणाला मटका, कोणाला झटका | पुढारी

सांगली जिल्हा परिषद : आरक्षणामुळे कोणाला मटका, कोणाला झटका

सांगली : संजय खंबाळे : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. आरक्षण सोडतीमध्ये अनेकांना ‘मटका’ लागला आहे तर, अनेक दिग्गजांना ‘झटका’ बसला आहे. परिणामी उमेदवार निश्चित करताना नेतेमंडळींची कसोटी लागणार आहे. अनेक मतदारसंघ राखीव झाल्याने नवख्यांना संधी मिळणार आहे. या निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण आतापासून तापू लागले आहे.

स्थानिक स्वराज संस्थेमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेनेसह इतर घटक पक्षांना आपली ताकद किती आहे हे आता दाखवण्याची वेळ आली आहे. ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी होण्याची सध्या तरी चिन्हे आहेत. मात्र ‘बोल आघाडीचे करून डाव स्वबळा’चा आखल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रामुख्याने काँग्रेसचे नेते आणि पदाधिकार्‍यांनी सावध भूमिका घेतली आहे.

मिरज तालुक्यात भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचे प्राबल्य आहे. या तालुक्याच्या पश्चिम भागातील कवठेपिरान गटातून पंचायत समितीचे उपाध्यक्ष अनिल आमटवणे, अरूण कोरे यांची नावे चर्चेत आहेत. कसबे डिग्रज गटातून माजी जि. प. सदस्या संयोगीता कोळी, माजी सरपंच मंजुषा पवार उमेदवारी मागण्याची शक्यता आहे. हरिपूर या नव्याने झालेल्या गटात भाजपकडून राजश्री तांबवेकर तर, शोभा मोहिते यांचेही नावे चर्चेत आहे. बुधगाव मतदारसंघातून भाजपकडून प्रकाश आदाटे, राष्ट्रवादीतून विज्ञान माने, गजानन कांबळे आणि शिवसेनेतून सुनील आवळे हे उमेदवारीसाठी दावेदार मानले जातात. म्हैसाळ गट खुला झाल्याने माजी अध्यक्षा प्राजक्ता कोरे पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. आरग गटातून सागर वडगावे, लिंगनूरचे सरपंच मारुती पाटील, अरविंद देसाई, वसंत खाडे हे इच्छुक आहेत. भोसे गटातून बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील, अरुण पाटील, शिवाजी डोंगरे हे इच्छुक आहेत.

वाळवा तालुका हा माजी मंत्री जयंत पाटील यांचा हुकमी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. गेल्या निवडणुकीत या तालुक्यात 6 उमेदवार निवडून आणण्यात त्यांना यश आले होते. काँग्रेस, महाडिक आणि नायकवडी गटाने 5 जागेवर विजय संपादन केला होता. माजी मंत्री पाटील यांची घोडदौड रोखण्यासाठी यंदाही त्यांच्या कट्टर विरोधकांनी तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. बागणी गटात राष्ट्रवादीतून संभाजी कचरे, वैभव शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. कासेगाव मतदासंघातून माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील यांची पुन्हा एन्ट्री होणार आहे. पेठ मतदारसंघ खुला असल्याने इथे मोठी चुरस होणार आहे. सम्राट महाडिक, राहुल महाडिक यांची नावे आतापासून चर्चेत आली आहेत. बोरगाव गट आरक्षित झाल्याने गेल्या कित्येक वर्षापासून काँग्रेसचा झेंडा फडकविणारे जितेंद्र पाटील यांना झटका बसला आहे. हा गड काँग्रेसचा हुकमी गट मानला जातो. त्यामुळे या गटात ग्राऊंड लेव्हलला चाचपणी होऊन उमेदवार निश्चित होणार आहे. वाटेगावातून रवींद्र बर्डे, प्रकाश पाटील तर कामेरीतून जयराज पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा गट कार्यरत आहे. मात्र माजीमंत्री शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने याठिकाणी राष्ट्रवादीला बळ आले आहे. दुसर्‍या बाजूला सत्यजित देशमुख यांनी भाजपाची ताकद या भागात वाढवली आहे. त्यामुळे या भागात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची शक्यता आहे. मांगले गटात भाजपकडून रणजित नाईक तर, राष्ट्रवादीकडून माजी सभापती प्रल्हाद पाटील हे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सागाव मतदारसंघात राष्ट्रवादीकडून अश्विनी नाईक आणि भाजपमधून छाया पवार यांची नावे चर्चेत आहेत. कोकरूड गटात भाजपमधून विकास नांगरे, पोपटराव पाटील, शामराव सावळी तर राष्ट्रवादीतून शिवाजी घोडे-पाटील, सुहास घोडे-पाटील यांची नावे चर्चेत आहेत. वाकुर्डे बुदु्रक मतदारसंघात तानाजी कुंभार, राष्ट्रवादीतून दिलीप झेंडे, शरद पाटील हे उमेदवारीसाठी दावा करणार असल्याचे बोलले जाते.

कडेगाव तालुक्यात कदम गटामुळे काँग्रेसची आणि देशमुख गटामुळे भाजपाची ताकद आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाचे तीन आणि काँग्रेसचा एक सदस्य निवडून आला होता. कडेपूर मतदारसंघ खुला झाल्याने माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या पत्नी अपर्णा देशमुख भाजपकडून लढण्याची शक्यता आहे. तडसर मतदारसंघात हणमंत पवार, विनायक पवार, संभाजी मुळीक, समाधान घाडगे, सुरेश मुळीक यांची नावे चर्चेत आहेत. देवराष्ट्रे गटात डॉ. जितेश कदम, दिग्विजय कदम हे इच्छुक असल्याचे बोलले जाते.

तासगाव तालुक्यात खा. संजय पाटील आणि आ. सुमन पाटील गट म्हणजेच भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच काटा लढत होणार आहे. मांजर्डे गटात राष्ट्रवादीतून धनश्री पाटील, कमल पाटील, भाजपाकडून अनुराधा पाटील, संध्याराणी पाटील, सावळज गटात राष्ट्रवादीतून ताजुद्दीन तांबोळी, अनिल थोरात, किशोर उनउने तर, भाजपाकडून दिलीप देसाई, संजय थोरात यांची नावे चर्चेत आहेत. चिंचणी मतदासंघात राष्ट्रवादीतून खा. पाटील यांचे पुतणे अक्षय पाटील, युवराज पाटील तर भाजपाकडून खा. पाटील यांचा मुलगा प्रभाकर पाटील, अमित पाटील असे प्रमुख दावेदार मानले जातात. कवठेएकंद गटात सर्जेराव पाटील, सिराज मुजावर, महेश पाटील, बाबुराव लगारे, सचिन जाधव, महेश खराडे यांची नावे चर्चेत आहेत.

पलूस तालुक्यात काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम व भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांच्या गटाची ताकद आहे. परंतु गेल्या निवडणुकीत भाजपचे तीन सदस्य निवडून आले होते तर, राष्ट्रवादीचा एक सदस्य निवडणूक आला होते. त्यामुळे या मतदासंघात भाजप विरुद्ध आघाडी अशी लढत होण्याची शक्यता आहे.

जत तालुक्यात भाजप आणि काँग्रेसची पकड आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादी कमकुवत आहे. वाळेखिंडी गटात जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, भाजपातून प्रभाकर जाधव तर काँग्रेसकडून नाथा पाटील यांची नावे चर्चेत आहेत. डफळापूर मतदारसंघात भाजपाकडून लता वगरे यांच्या नावाची चर्चा आहे. तर काँग्रेसकडून चाचपणी सुरू आहे. जाडरबोबलाद मतदासंघात तम्मनगौडा रवी-पाटील यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच पंचायत समितीचे सदस्य सोमनाथ हक्के, पांडुरंग वाघमोडे हे उमदेवारी मागण्याची शक्यता आहे.
खानापूर तालुक्यात आ. अनिल बाबर आणि माजी आ. सदाशिव पाटील यांच्या गटाची ताकद आहे. गेल्या निवडणुकीत बाबर गटाचे तीनही सदस्य निवडून आले होते. मात्र माजी मंत्री जयंत पाटील यांच्या बळामुळे आणि स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे नेटवर्क असल्याने माजी आ. पाटील हे बाबर यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करू शकतात. नागेवाडी गटातून माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांची पत्नी सोनिया बाबर लढण्याची शक्यता आहे. तसेच लेंगरे गटातून पंचायत समितीच्या उपसभापती सारिक माने यांचीही नवे चर्चेत आहे.

कवठेमहांकळ तालुक्यात आबा गट, सगरे गट, माजी मंत्री अजितराव घोरपडे गट आणि खा. पाटील असे चार गट आहेत. येथील पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीत असूनही सगरे गटाने वेगळी भूमिका घेतली होती. मात्र ते आजही राष्ट्रवादी पक्षाचे काम करतात. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या भूमिकेविषयी तर्कवितर्क व्यक्त होत आहे. सध्या ढालगाव गटातून चंद्रकांत हाक्के, अनिल शिंदे, विकास हक्के, रावसाहेब पाटील, अमर शिंदे तर, कुची मतदारसंघात सूर्यवंता कोळेकर, छायाताई कोळेकर, देशिंग गटात राजश्री बनसोडे, रांजणी मतदासंघात अजित बनसोडे उमेदवारी मागण्याची शक्यता आहे.

आटपाडी तालुक्यात भाजपाने चांगलेच बस्तान बसविले आहे. गेल्या निवडणुकीत चारही जागेवर भाजपाने विजय मिळविला होता. यंदाच्या निवडणुकीत देशमुख आणि पडळकर गट पुन्हा जोमाने निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. निंबवडे गटात ब्रह्मानंद पळकर, बंडू कातुरे, दिघंचीत प्रणव गुरव, जहांगीर तांबोळी, करगणी मतदासंघात तानाजी पाटील, हर्षवर्धन देशमुख यांची नावे चर्चेत आहेत.

Back to top button