काय डोंगर… काय झाडी; पर्यटन ओकेमध्ये हाय! | पुढारी

काय डोंगर... काय झाडी; पर्यटन ओकेमध्ये हाय!

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा

पावसामुळे वाळवा तालुक्यातील डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत. निसर्गाला बहार आल्याने विरंगुळ्यासाठी पर्यटकांचा अशा नयनरम्य ठिकाणी तसेच तीर्थक्षेत्राकडे ओढा वाढला आहे. सुटीच्या दिवशी अशा ठिकाणावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
वाळवा तालुक्यात पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक ठिकाणे व तीर्थक्षेत्रे आहेत. ज्या लोकांना पर्यटनासाठी लांब जाणे शक्य नाही. असे अनेक हौसी लोक तालुक्यातीलच या विरंगुळ्याच्या ठिकाणी सुटीच्या दिवशी फिरायला जाताना दिसत आहेत.

तालुक्यात प्रामुख्याने तीर्थक्षेत्र मल्लिकार्जुन, बहे रामलिंग बेट, किल्‍लेमच्छिंद्रगड, तुकाईदेवी परिसर, रेठरेधरण तलाव परिसर, मरळनाथपूर डोंगर परिसर, शिवपुरी, डोगरवाडी, इस्लामपुरातील दत्त टेकडी परिसराबरोबर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सागरेश्वर अभयारण्य, चौरंगीनाथ आदी ठिकाणे सध्या पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.पर्यटन विकास निधीतून यातील बहुतांश ठिकाणांचा कायापालट झाला आहे. पक्क्या रस्त्यांच्याबरोबर पर्यटकांसाठी याठिकाणी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

Back to top button