इस्लामपूर : व्यावसायिकाची पावणेनऊ लाखांची फसवणूक | पुढारी

इस्लामपूर : व्यावसायिकाची पावणेनऊ लाखांची फसवणूक

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : 22 टन साखरेची परस्पर विल्हेवाट लावून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची 8 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राजदीप अर्जुन माने (रा. कामेरी, ता. वाळवा), पवन बाळासाहेब शिंदे, अभिजित उर्फ सनी बाळासाहेब शिंदे (रा. येडेनिपाणी, ता. वाळवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

याप्रकरणी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक प्रशांत निवास बुगले (रा. कोडोली, ता. पन्हाळा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, येथील एका कारखान्यातून 22 टन साखर रत्नागिरी येथे पोहोच करायचे काम प्रशांत यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीला मिळाले होते. संशयित पवन, राजदीप, अभिजित हे ट्रक (एम.एच.10/झेड-4544) मधून 22 टन साखर घेऊन 30 मेच्या सायंकाळी कारखान्याच्या गोडाऊनमधून बाहेर पडले होते. मात्र त्यांनी रत्नागिरी येथील संबंधित ठिकाणी साखर पोहोचविली नाही. तसेच त्या साखरेचे पैसेही संशयितांनी दिले नाहीत.

प्रशांत यांनी संशयितांशी संपर्क केला असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यानंतर प्रशांत यांनी शनिवारी इस्लामपूर पोलिस ठाण्यात धाव घेत संशयितांविरोधात फिर्याद दिली.

Back to top button