सांगली : जलशुद्धीकरणसाठी 53 लाखांची पावडर खरेदी होणार | पुढारी

सांगली : जलशुद्धीकरणसाठी 53 लाखांची पावडर खरेदी होणार

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे जलशुद्धीकरण प्रक्रियेसाठी एक वर्ष कालावधीकरिता 53 लाखांच्या पी.ए.सी. केमिकल पावडर खरेदीसाठी निविदा मागविण्याचा विषय स्थायी समितीपुढे आला आहे. महापालिका क्षेत्रात पाणी गळती, देखभाल दुरुस्ती, सुधारणेच्या अंदाजे 1 कोटींच्या कामांसाठी एजन्सी नियुक्तीचा विषयही सभेपुढे आहे.

महानगरपालिकेत शुक्रवारी स्थायी समिती सभा आहे. महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडील जलशुद्धीकरण प्रक्रियेसाठी एक वर्ष कालावधीकरीता अंदाजे 53 लाख रुपयांच्या 155 टन पी.ए.सी. पावडर केमिकलची खरेदी करण्यासाठी निविदा मागविण्याचा विषय सभेपुढे आहे. महापालिका क्षेत्रात सर्व प्रकारच्या मेन पाईप, वितरण व्यवस्थेवरील सार्वजनिक नळ, प्रशासकीय इमारतीचे कनेक्शन, व्हॉल्व्हस्ची गळती व इतर स्वरुपाची दैनंदिन देखभाल दुरुस्ती, पाणीपुरवठा सुधारणा विषयक कामांसाठी एक वर्ष कालावधीकरीता अंदाजे 1 कोटींच्या कामांसाठी स्वतंत्र दर करार एजन्सी नियुक्ती करण्यास निविदा मागविण्याचा विषय सभेपुढे आहे.

कुपवाड वॉर्ड क्र. 1 व 2 हद्दी लगतच्या मंगळवार पेठ बाजार रस्ता आणि उल्हासनगर उत्तर येथील कालबाह्य झालेली वितरण व्यवस्था बदलून नवीन पाईपलाईन टाकणे, वखारभाग गुजराती हायस्कूल परिसर येथील जुनी सीआय पाईप खराब झाल्याने नवीन वितरण व्यवस्था पाईपलाईन टाकणे, चाणक्य हॉटेल चौक रोड मंगलमूर्ती कॉलनी कॉर्नरपासून तुळजाईनगर कांचनरत्न अपार्टमेंटपर्यंत फिटर मेन पाईपलाईन टाकण्यासाठी काम करून घेण्यास मान्यतेचा विषय सभेपुढे आहे.

कुपवाड त्रिकोणी बागेसाठी 48 लाखांची निविदा

कुपवाड शहरातील त्रिकोणी बाग येथील महापालिकेच्या खुल्या जागेमध्ये उद्यान विकसीत करण्याच्या 48 लाखांच्या निविदेस मान्यतेचा विषय सभेपुढे आहे. ही निविदा 21.77 टक्के कमी दराची आहे. समतानगर येथे रेल्वे रुळाखालून ड्रेनेज पाईप समतानगर येथे रेल्वे रुळाखालून हॉरिझॉन्टल डायरेक्शनल ड्रिलींग पद्धतीने ड्रेनेज पाईप टाकण्याच्या निविदेस मान्यता देण्याचा विषय सभेपुढे आहे.

महापौर मुंबईला…!

महानगरपालिकेला 100 कोटी विकास निधींची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच केली होती. त्याची पुढील कार्यवाही तसेच महापालिकेच्या अन्य कामांच्या फाईल्सच्या मंत्रालयस्तरावरील मंजुरीच्या अनुषंगाने महापौर दिग्विजय सूर्यवंशी मुंबईला गेले आहेत. शिवसेना आमदारांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झाले आहे. या पार्श्वभूमीवर या कामांकडे लक्ष लागले आहे.

Back to top button